मधमाशीपालनासाठी लागणारी आवश्यक उपकरणे

Shares

शेतकरी सतत चांगल्या व्यवसायाच्या शोधात असतात. जगभर मधमाशीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असून भारतातही मधमाशी पालन (Beekeeping) व्यवसायामध्ये वाढ होत आहे. मधमाश्या पालनाचे यश पूर्णपणे मधमाशी वसाहतींची देखभाल, शास्त्रीय पद्धतीने केलेले व्यवस्थापन या प्रमाणेच त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमाणित पेट्या, यंत्रे, उपकरणे (Equipment) आणि अवजारे यावर अवलंबून असते. भारतीय मधूपेटयांचे हे सर्व भाग लाकडी फळ्यापासून तयार करतात. पोळे बांधण्याकरिता तयार केलेल्या मधुपेट्या व त्यांतील चौकटी तयार करताना काटेकोरपणा पाळावा लागतो. त्यांच्या काही प्रमुख भागांची माहिती आज आपण घेणार आहोत

हाईव्ह टूल किंवा पटाशी
मधुकोशातील लाकडी चौकटी मेणामुळे एकमेकींस चिकटल्यास, त्या अलग करण्याकरिता या हत्याराचा उपयोग केला जातो. मधुकोश किंवा शिशुकोश यांच्या तळावर काही घाण चिकटून बसल्यास तीही या हत्याराने खरडून काढता येते.

मध पोळ्याची सुरी (अन कॅंपिंग नाईफ)
सुपर फ्रेममध्ये मेणाच्या झाकणाने बंद केलेल्या पोळ्यातून पूर्ण परिपक्व मध काढण्यासाठी या सुरीचा उपयोग करतात. मेणाचे झाकण अलगद कापून ती चौकट मध उत्सर्जन यंत्रात ठेवून मध काढतात, त्यामुळे पोळे तसेच्या तसे राहते. ते चौकटीसह पुन्हा पुन्हा वापरता येते.

मध उत्सर्जन यंत्र (हनी एक्स्ट्रॅक्टर )
आपल्या घरी वापरात असलेल्या वॉशिंग मशीनप्रमाणे पोळ्यातील मध काढण्याकरिता यंत्राचा उपयोग केला जातो. मधाला स्पर्श होणारे याचे सर्व भाग स्टीलचे असतात. या स्टेनलेस स्टील ड्रममध्ये मधाने भरलेल्या चौकटी उभ्या ठेवतात. हॅण्डलच्या साहाय्याने गोल फिरवतात. केंद्रोत्सारक प्रेरणेने त्यांतील मध बाहेर फेकला जातो. यंत्राच्या तळाशी असलेल्या नलिकेतून तो जमा केला जातो. या पद्धतीत पोळ्याची व माश्यांची हानी होत नाही. मोकळी चौकट पुन्हा मधुपेटीत ठेवल्यास त्याच चौकटीतील रिकाम्या पोळ्यात पुन्हा मध साठवितात. तसेच पोळे परत बांधण्यासाठी लागणारे मेण व ते तयार करण्यासाठी लागणारा मध यांचीही बचत होते. मधमाश्यांचा वेळ वाचतो. परिणामी मधाचे उत्पादन वाढते. मोठ्या प्रमाणावर मध उत्पादन व प्रशोधन करण्यासाठी योग्य क्षमतेची सयंत्रे वापरतात. मोठे साठवण, बॉटलिंग, पॅकेजिंग, लेबलिंग इ. हाताने किंवा स्वयंचलित यंत्राद्वारे करतात.

इतर साधने
वाढत्या मधमाशी पालनाच्या प्रमाणानुसार इतर अनेक उपकरणे, यंत्रे, साहित्य इ.ची गरज भासू लागते. पराग सापळा (पोलन ट्रॅप) लावून मधमाशांच्या वसाहतीपासून पराग मोठ्या प्रमाणावर उत्पादन येते. राजअन्न (रॉयलजेली) च्या उत्पादनासाठी ग्राफ्टिंग उपकरणे आणि क्वीन कप किट यांचा उपयोग करतात. प्रोपोलिस गोळा करण्यासाठी विशिष्ठ जाळी आवश्यक असते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *