असे करा डाळिंबावरील तेल्या रोगाचे नियंत्रण

Shares

भारतामध्ये डाळिंब हे दुर्लक्षित व कमी उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जायचे. पण कालांतराने औषधी गुणधर्मामुळे याचे महत्त्व वाढले. मग त्याचे उत्पन्न सुद्धा वाढले. डाळिंब पिकाला सध्या वेगवेगळ्या रोगांचा सामना करावा लागत आहे. त्यापैकी एक रोग म्हणजे तेल्या रोग. यात पिकावर आणि फळावर तेलकट डाग पडतात. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. त्याकरिता प्रतिबंधक उपाय योजना करणे आवश्यक आहे.

तेल्या रोगाची लक्षणे :-

१. या रोगाचा प्रादुर्भाव पाने, फुले, खोड आणि फळांवर होतो.
२. सुरुवातीस पानांवर लहान तेलकट किंवा पाणथळ डाग दिसतात.
३. कालांतराने डाग काळपट होतात आणि डागा भोवती पिवळे वलय दिसते. त्यासोबतच ते मोठे होऊन तपकिरी किंवा काळ्या रंगाचे होतात.
४. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात. डाग मोठा झाल्यावर पाने पिवळी पडून गळून पडतात.
५. फुलांवर आणि कळ्यांवर गर्द तपकिरी व काळपट डाग पडतात. पुढे यामुळे फुलांची व फळांची गळ होते.
६. फळांवर लहान डाग एकत्र आले की मोठ्या डागात रूपांतर होते. फळांवर या डागांमुळे आडवे उभे तडे जातात.
७. फळांची प्रत पूर्णपणे खराब होते व तडे मोठे झाल्यावर फळे सडतात आणि गळून पडतात.
८. प्रामुख्याने खोडावर व फांद्यांवर सुरुवातीला काळपट किंवा तेलकट डाग गोलाकार दिसतात.
९. खोडावर पडणारा हा डाग खोलवर गेल्यास खाच तयार होते आणि तेथून झाड मोडते. तसेच फांद्यांवर डागांची तीव्रता वाढल्यावर फांद्या डागा पासून मोडतात.

कसा होतो या रोगाचा प्रसार :-

१. याचा प्रसार प्रामुख्याने बॅक्टेरीयल ब्लाईट ग्रस्त मातृ वृक्षापासून बनविलेल्या रोपाद्वारे होतो.
२. रोगट डागांवरून उडणारे पावसाचे थेंब, पाट पद्धतीने दिलेले ओलिताचे पाणी, निर्जंतुकीकरण करताना वापरण्यात येणारी छाटणीची अवजारे तसेच विविध कीटकांमुळे या रोगाचा प्रसार होतो.

तेल्या रोगाचे एकात्मिक रोग नियंत्रण :-

१. स्वच्छता मोहीम काळजीपूर्वक राबवावी. खाली जमिनीवर पडलेली पाने गोळा करून नष्ट करावीत.
२. रोप कॅल्शियम हायड्रोक्लोराइड ने निर्जंतुक केलेल्या खड्ड्यात लावावे.
३. रोपांची लागवड कमीत कमी साडेचार मीटर बाय 30 मीटर अंतरावर करावी आणि प्रत्येक ठिकाणी तीन खोड ठेवावी.
४. फळे काढणी पावसाळ्यात झाली असेल तर ब्रोनोपोल 500 पीपीएम फवारावे. ( ब्रोमोपोल 50 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात)
५. संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला तीन महिने विश्रांती द्यावी.
६. छाटणी झाल्यानंतर लगेच कापलेल्या भागावर 10 टक्के बोर्डो पेस्ट लावावी.
७. झाडाच्या खोडाला नीम ओईल + बॅक्टेरिया नाशक ( 500 पीपीएम)+ कॅप्टन 0.5 टक्के याचा मुलामा द्यावा.
८. पानगळ व छाटणीनंतर बॅक्टेरिया नाशक + कॅप्टन 0.5 टक्के यांची फवारणी करावी.
९. नवीन पालवी फुटल्यावर बॅक्टेरिया नाशक ( 250 पीपीएम)/ बोर्डो मिश्रण ( एक टक्का )+ कॅप्टन (0.25 टक्के) ची फवारणी करावी.

अशाप्रकारे योग्य काळजी आणि दक्षता घेतल्यास येणारे उत्पादन हे चांगले तयार होते आणि नफा सुद्धा भरपूर होतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *