शेतीसाठी हे औषध एक उपाय अनेक !

Shares

सेंद्रिय शेतीमध्ये कीडरोग नियंत्रणासाठी कडुनिंब अत्यंत उपयुक्त ठरतो. कडुनिंबापासून निंबोळ्या किंवा पानांचा अर्क, निंबोळी तेल हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कीड, रोग व जीवाणू नियंत्रक आहे. निबोळी पेंडही चांगल्या दर्जाचे सूत्रकृमीरोधक खत म्हणून वापरता येते.कडुलिंब हे पिकावर नारळ, केळी, नागवेलीची पाने व हरभऱ्यावरील मर रोग,वाटाणे, उडीद यावरील भुरी रोग बटाटे, साळी यावरील विषाणू रोग हरभऱ्यावरील मुळकूज, मुगाचे रोप जळणे, मक्‍यावरील डाउनी मिलड्यू, साळीवरील बॅक्‍टेरियल ब्लाइट इत्यादी. या व्यतिरिक्त बुरशीनाशक, जीवाणूनाशक व विषाणूरोधक म्हणून परिणामकारक आहे.

किटकनाशक बनवण्याची पद्धती

निंबोळी अर्क(5 टक्के) तयार करण्याची पद्धती

१. प्रथम उन्हाळ्यात गोळा करून साठवलेल्या पाच किलो निंबोळ्या फवारणीआधी 1 दिवस कुटून बारीक कराव्यात. २. हा चुरा 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावा. तसेच 1 लिटर पाण्यात रिठा पावडर किंवा शिकाकाई पावडर वेगळा भिजत टाकावा.
३. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 लिटर पाण्यातील निंबोळीद्रावण पातळ कपड्यातून गाळून घ्यावे. त्यात 1 लिटर रिठा पावडर द्रावन मिसळावे. निंबोळीचा 5 टक्के अर्क तयार होतो
४. लिटर अर्कामध्ये 90 लिटर पाणी टाकून फवारणीसाठी वापरावा. चांगल्या परिणामकारक फवारणीसाठी 1 दिवस आधी तयार केलेला अर्कच वापरावा.

कडुनिंबाच्या पानापासून तयार केलेला अर्क

१. कडुनिंबाची 7 किलो स्वच्छ धुतलेली पाने पाट्यावर किंवा मिक्‍सरमध्ये बारीक करावीत.
२. हे मिश्रण 5 लिटर पाण्यामध्ये मिसळून रात्रभर भिजत ठेवावे.
३. सकाळी स्वच्छ कापडातून गाळून घ्यावे. हा संपूर्ण अर्क 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणीसाठी वापरावा.

निंबोळी तेल

१. उन्हात चांगल्या वाळवलेल्या निंबोळ्यांचे वरील साल काढून घ्यावे.
२. पांढरा गर उखळीमध्ये ठेचून लगदा तयार करावा. त्यामध्ये थोडे पाणी टाकावे. हा लगद्याचा गोळा एका परातीत चांगला थापावा. त्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर तेल दिसेल.
३. हा तेलाचा लगदा हाताने चांगला दाबून त्याचे तेल काढावे. गोळ्यातून थेंबाथेंबाने तेल पाझरते. गोळा पुन्हा – पुन्हा तिंबून हाताने दाबावा.
४. गोळ्यातील तेल पूर्णपणे काढावे. उरलेला गोळा पाण्यात टाकून उकळल्यास तेल पाण्यावर तरंगते. ते चमच्याने काढून घेता येते. अर्थात, घाणीमधून अधिक प्रमाणात तेल मिळते.
५. 1 किलो बियांपासून साधारणतः 100 ते 150 मिली तेल मिळते.
६. कडुनिंबाच्या तेलामध्ये ऍझाडिरेक्‍टीन 0.15 टक्के, सालान्निन 0.5 टक्के, ऍसिटील निंबीन 0.15 टक्के हे घटक असतात.
७. फवारणीसाठी तेल वापरताना साधारणतः 1 ते 2 टक्के तेल म्हणजेच 10 ते 20 मिली तेल प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे वापरावे.

कडुनिंबाच्या बियांपासून तयार केलेली भुकटी

१. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने कडुनिंबाच्या बियांच्या भुकटीचा तांदळातील सोंडे, धान्य पोखरणारे भुंगेरे व खापरा भुंगेरे या सारख्या साठविलेल्या धान्यावरील किडींवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. २. गहू धान्याचे आकारमानाच्या 0.5 टक्के, 1 टक्के व 2 टक्के कडुनिंबाच्या बियांची भुकटी तयार करून धान्यात मिसळली असता धान्याचे किडींपासून 321 ते 329 दिवसापर्यंत संरक्षण झाल्याचे आढळले.
३. 1 टक्के भुकटीच्या द्रावणात बी 2 तास भिजत ठेवले असता हे बी पेरल्या नंतर सुत्रकृमीचा उपद्रव 50 टक्के कमी होतो.

निंबोळी पेंड

१. जमीन नांगरल्यानंतर हेक्‍टरी 1 ते 2 टन निंबोळी पेंड मिसळल्यास वांग्याच्या झाडाचे शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळी व सूत्रकृमीपासून वांगी पिकाचे संरक्षण होते.
२. खरीप – रब्बी हंगामासाठी आपल्या शेतात आजुबाजुला कडूनिंबाच्या निंबोळ्या जमा करा वेळ दडवू नका कारण फक्त याच हंगामात या उपलब्ध असतात जरा शेतात नजर फिरवा पहा झाडावर व खाली खुप निंबोळ्या पडलेल्या दिसतील त्या जमा करून वरील टरफले निंबोडी अर्का साठी काढुन घ्या कारण कुटता येत नाही किंवा दळता येत नाही. रोप तयार करणे साठी पण वापरता येईल.

कडुनिंबातील महत्त्वाचे घटक

१. कडुनिंबाच्या पाने व बियामध्ये खालील घटक अधिक प्रमाणात आढळून येतात.
२. ऍझाडिरेक्‍टीन या प्रमुख घटकामुळे किडी झाडापासून दूर राहणे, त्यांना अपंगत्व येणे या बाबी घडतात. साधारणतः
३. हा 90 टक्के परिणामकारक असून, किडींचे जीवनचक्र संपुष्टात आणण्याची शक्ती या घटकांमध्ये आहे. 1 ग्रॅम बियांमध्ये 2 ते 4 मिली ग्रॅम ऍझाडिराक्‍टीन असते.
४. निम्बीन व निम्बीडिन या महत्त्वाच्या घटकामध्ये विषाणूविरुद्ध क्रिया करण्याची शक्ती आहे. हा घटक पिकांवरील विषाणूजन्य रोगांवर, तसेच जनावरांच्या विषाणू रोगांवरसुद्धा नियंत्रणास उपयुक्‍त ठरतो.
५. किडी झाडांची व रोपांची पाने खाऊ शकत नाही. टोळधाडीसाठीही परिणामकारक ठरू शकतो.
६.सालान्निन हे पिकांवरील पाने खाणाऱ्या किडींवर प्रभावीपणे कार्य करते. भुंगे, खवले, कीटक यांवरसुद्धा प्रभावी आहे.
६. एकंदरीत कडुनिंबाच्या पानापेक्षा बियांमध्ये जैविक क्रिया करणारा घटक तीव्र असतो. त्यामुळे किडींच्या विविध प्रजातींवर परिणामकारक ठरते. त्यांच्या शरीररचनेत व क्रियेत बदल होऊन त्यांना अपंगत्व येते.

कडुलिंबाचे फायदे आणि उपयोग

१. अंडी घालण्यास प्रतिबंधात्मक कार्य कडुनिंबापासून तयार करण्यात आलेला अर्क किडीस अंडी घालण्यास प्रतिबंधक, अंडीनाशक, कीडरोधक दुर्गंध, किडीस खाद्यप्रतिबंधक, किड वाढ रोधक व किटकनाशक या विविध मार्गाने परिमाण साधतो. पिकातील सुमारे 400 ते 500 प्रजाती नियंत्रणासाठी प्रभावी ठरतो.
२. कडुनिंब अर्कामुळे पिकावरील विविध किडीच्या मादी अंडी घालण्यापासून परावृत्त होतात. उदा. घाटे अळी (Helicoverpa Armigara) तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodoptera Litura),
३. एरंडीवरील उंट अळी (Castor Semilooper) पांढरी माशी, गुलाबी बोंड अळी तसेच साठवून ठेवलेल्या धान्यामध्ये सुद्धा अंडी घालण्यास प्रतिबंध ठरते.
४. 3 टक्के कडुनिंबाची वाळलेली पाने साठविलेल्या उडीद धान्यासाठी 5 महिन्यापर्यंत परिणामकारक ठरतात.
५. या अर्कामुळे किडींची अंडी उबवण्यामध्ये अडचणी येतात.
६. या प्रक्रियेत अंड्याच्या आतील म्हणजेच गर्भाशयातील ढवळाढवळीमुळे प्रभावी नियंत्रण करते. उदा. तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodoptera Litura) व घाटे अळीवर कडुनिंबाचा अर्क चांगला अंडीनाशक म्हणून कार्य करतो.
७. कीडरोधक दुर्गंध कडुनिंबापासून किड शोधक तीव्र गंधामुळे विविध किडींना दूर ठेवणे शक्‍य होते.उदा. भुंगा, पांढरी माशी, घरमाशी, पिसू, जपानी किटक, लष्करी अळी, मिलीबग इत्यादी.
८. कडुनिंबाच्या बियांपासून तसेच तेलापासून तयार केलेला अर्क पिकांवर फवारणीसाठी वापरला असता विविध प्रकारच्या किडीस खाद्यप्रतिबंध करतो. उदा. पांढरी माशी, घरमाशी, मिलीबग, लष्करी अळी, तुडतुडे, फुलकिडे, उंटअळी इत्यादी.
९. कडुनिंबातील अझाडिराक्‍टीन हा घटक किडीची वाढ थांबवतो, तसेच कात टाकण्यास प्रतिबंध करतो. त्यामुळे कीड गुदमरून मरण पावते. पांढरी माशी, घरमाशी, पिस बटाट्यावरील कोलोरॅडोकिड, लष्करी अळी इत्यादी प्रकारच्या किडींची वाढ थांबते.
१०. या व्यतिरिक्त कडुनिंबाच्या बियातील गरामध्ये मेथेनॉलिक या रासायनिक घटकामुळे पाने खाणारी अळीची वाढ थांबते.
११. कडुनिंबापासूनचे अर्क व कीडनाशके ही कीटकांवर बहुआयामी आंतरप्रवाही किटकनाशकाप्रमाणे कार्य करतात.
१२. मुख्यत्वे कडुनिंबाची पाने, फळे व झाडाच्या सालीपासून उत्तम किडनियंत्रक तयार करता येते. निंबोळी अर्कापासून किड नियंत्रण करणे हे त्याच्या तीव्रता व मात्रेची वेळ यावर अवलंबून असते.
१३. मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, ठिपक्‍याची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, हिरवी बोंडअळी, मुंगी प्रजाती, भुंगा प्रजाती, पाने गुंडाळणारी अळी, उंटअळी, तांबडी केसाळ अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हिरवे ढेकूण, फळमाशी, ज्वारी व मक्‍यावरील खोडकिडा, टोमॅटोवरील सूत्रकृमी, कोळी, लाल कोळी, नाकतोडा, लाल ढेकूण, शेंडे व पाने पोखरणारी अळी, लष्करी अळी नियंत्रित होते.

मिलिंद जि गोदे

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *