आयुष्य बदलून टाकणारी स्ट्रॉबेरीची शेती…

Shares

फळबागांचा विचार करायला झाल्यास इतर फळांप्रमाणेच आपले वेगळेपण मिरविणारे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीची लागवड आपल्या देशात मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. स्ट्रॉबेरी हे मुख्यतः थंड हवामानात येणारे पीक आहे. पण आताच्या काळात या पिकाची लागवड इतर ठिकाणीसुद्धा होऊ लागली आहे. या फळाला देशात आणि परदेशात सुद्धा मागणी असल्याने याचा खप प्रचंड होतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणे फायद्याचे ठरते. स्ट्रॉबेरीच्या ताज्या फळांना युरोपीय देशांमध्ये निर्यातीसाठी भरपूर वाव आहे. स्ट्रॉबेरीचा वापर आईस्क्रीम, जॅम, जेली, साबण, धूप व सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.

लागवडीचा योग्य काळ
आपल्या देशाचा विचार करता स्ट्रॉबेरी लागवड सप्टेंबर मध्ये केली जाते. कारण हा काळ स्ट्रॉबेरी लागवडीसाठी योग्य मानला जातो. स्ट्रॉबेरी ही कोणत्याही प्रकारच्या मातीत लावता येते. पण लाल मातीमध्ये उत्पादन जास्त येते. स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी 15 ते 30 अंश सेंटिग्रेड तापमान असायला पाहिजे. तापमान जास्त असेल तर उत्पादनावर याचा वाईट परिणाम होतो.

स्ट्रॉबेरीच्या मुख्य जाती
केम्रोजा, कॅलिफोर्निया, रजिया, सेलवा, चान्डलर, रानिया, विंटर डोन, स्वीट चार्ली या स्ट्रॉबेरीच्या मुख्य जाती आहेत.

कशी करावी स्ट्रॉबेरी लागवड?
या पिकाची गादीवाफ्यावर 60 बाय 30 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी. स्ट्रॉबेरीची मुळे मातीच्या वरच्या 15 ते 20 सेंटिमीटर पर्यंतच्या थरातच वाढतात. चांगल्या वाढीसाठी मऊ आणि भुसभुशीत गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यावर स्ट्रॉबेरीची लागवड दोन ओळी, तीन ओळी शिवा चार ओळी पद्धतीने सुद्धा केली जाते. दोन ओळी पद्धतीसाठी 90 सेंटिमीटर रुंद व 30 ते 45 सेंटिमीटर उंची असलेल्या गादीवाफ्यावर दोन रोपातील अंतर 30 सेंटिमीटर व दोन ओळींतील अंतर 60 सेंटिमीटर असावे. दोन ओळी पद्धतीमध्ये प्रति एकरी 22 ते 25 हजार रोपे लागवडीसाठी लागतात. तीन ओळी पद्धतीसाठी 120 सेंटिमीटर रुंद व 30 ते 45 सेंटिमीटर उंची गादी वाफे करावेत. चार ओळी पद्धतीने सुद्धा लागवड करता येते, पण अंतर मशागत, फळ तोडणी, गादीवाफ्यात प्लास्टिक मल्चिंग करणे यामध्ये अडचणी येतात म्हणून जास्त करून दोन ओळी पद्धतीने लागवड करायला पाहिजे.

लागवडीनंतर काय?
स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानंतर पाण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन वापरायला पाहिजे. जमिनीचा ओलावा लक्षात ठेवून वेळच्या वेळेला पीकाला पाणी द्यायला पाहिजे. स्ट्रॉबेरी मधून चांगले उत्पादन मिळण्यासाठी खताच्या प्रमाणाला खूप जास्त महत्त्व आहे. स्ट्रॉबेरीच्या खतांचे प्रमाण हे स्ट्रॉबेरीचा लावला गेलेला प्रकार आणि लागवड झालेल्या जमिनीचा पोत यांच्यावर अवलंबून असते. ही लागवड केल्यानंतर वेळच्या वेळी कृषी अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. लागवडीनंतर फक्त दीड महिन्यात फळे यायला सुरुवात होते आणि हीच प्रक्रिया पुढच्या चार महिने चालूच राहते.

तोडणी कधी करावी ?
स्ट्रॉबेरीची तोडणी ही मुख्यतः फळ भरीव वाटू लागले, पक्के झाल्याचे लक्षात आले, पीकावर भरगच्चपणा दिसू लागला आणि फळाचा रंग अर्ध्यापेक्षा लाल झाल्यावर तोडता येते. त्याआधीसुद्धा फळाची वाढ पाहून योग्य त्या वेळी आपण या फळांची तोडणी करू शकतो.
अशाप्रकारे देशविदेशांमध्ये सुद्धा प्रचंड मागणी असणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड कुठल्याही जमिनीत करता येतेच त्यासोबतच शेतकरी आलेल्या उत्पादनाला वेगवेगळ्या ठिकाणी निर्यात करून भरपूर फायदा मिळवू शकतात.

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *