सोयाबीनच्या दराला उतरती कळा, साठवलेल्या सोयाबीनचे करायचे काय ?
सोयाबीनचा दर कमी होतोय ? आता पुढे काय ?
सोयाबीनच्या दराची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. मागील महिन्याभरात सोयाबीनला योग्य दर मिळाला नाही यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या दरांचे अंदाज चुकत असल्याचे दिसत आहे. सोयाबीनचा भाव 8 हजारावर जाईल अशी आशा शेतकऱ्यांना असल्याने साठवणूक करण्यावर बऱ्याच शेतकऱ्यांनी भर दिला होता. दिवाळीनंतरचा काही काळ शेतकऱ्यांसाठी फायदेशीर जाणवला पण मागील महिन्याभरापासून शेतकऱ्यांचा अंदाज चुकीचा ठरताना दिसतोय. जास्त भाव मिळेल या अपेक्षेने अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केलेली असताना, मागच्या २ आठवड्यांमध्ये सोयाबीनच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली. यामुळे आता साठवणूकीमध्ये असलेल्या सोयाबीनचे काय करावे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पुन्हा 6 हजारांवर सोयाबीन :-
डिसेंबरच्या सुरवातीच्या काळात सोयाबीनचे दर हे 6 हजारावर गेले होते. याच काळात सोयापेंडची आयात होणार असल्याची चर्चा असल्याने सोयाबीनच्या दरावर त्याचा परिणाम झाला होता. पण, ही सोयापेंडची आयात होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केलेले असताना सुद्धा सोयाबीनचा दर कमी होत आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनचा दर तब्बल 200 रुपयांनी घसरला. यामुळे आता पुढील दिवसांमध्ये काय होईल याची चिंता आता शेतकऱ्यांना लागलेली आहे.
का कमी होताय भाव? :-
सोयाबीनची मागणी कमी झालेली दिसत आहे. यासोबतच प्रक्रिया उद्योजक आणि व्यापारीवर्ग यांचेसुद्धा सोयाबीन खरेदीकडे लक्ष नाही. यावेळी पहिल्यांदाच उन्हाळी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली असल्याने येणाऱ्या काळात सोयाबीनची टंचाई होणार नाही असा विचार बाजारपेठांमध्ये होत असल्याने दरात वाढ होत नसावी असा अंदाज व्यापाऱ्यांवर्गातून व्यक्त होताना दिसत आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी १२,००० पोत्यांची आवक झाली.
अस्थिर असणारा सोयाबीनचा दर आणि येत्या काळात अशी परिस्थिती असणार आहे याकडेच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क