फक्त ५०० रुपयांमध्ये सुरु होणारा जोडधंदा…!

Shares

जोडधंदा किंवा चांगले उत्पन्न देणारा उद्योग म्हटल्यावर आल्यावर आपल्याला कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, ससेपालन, मत्स्यपालन हे सर्व उद्योग माहित आहेत, पण यासोबतच एक चांगला उद्योग आहे ज्यात गिनी फाऊलचे पालन केले जाते. गिनी फाऊल पासून मांस आणि अंडी मिळतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी खूपच कमी खर्च लागतो. कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तर गिनी फाऊल हे खूप फायदेशीर ठरतात. यांच्या पालनासाठी वेगळा असा कोणताच खर्च येत नाही किंवा यांच्या देखरेखीसाठी आणि औषधांसाठी जास्तीचा खर्च होत नाही.
गिनी फाऊलच्या पालनासाठी मोठ-मोठाले शेड बनवायची गरज नाही. कोणत्याही हवामानामध्ये तंदुरुस्त राहणाऱ्या या पक्ष्याला शेड नसले तरी चालते. पोल्ट्रीचा कोणताही उद्योग करायचा झाल्यास आपल्याला पक्ष्यांच्या खाद्यावरती खूप खर्च करावा लागतो. पण या तुलनेत गिनी फाऊलसाठी फक्त ६० ते ७० टक्के खर्च येतो. त्याच प्रमाणे कोंबड्यांच्या औषधांसाठी आणि लसीकरणासाठी खूप खर्च येत असतो. पण गिनी फाऊलसाठी कोणत्याही प्रकारची लस लागत नाही किंवा औषधाची गरज राहत नाही. म्हणून ग्रामीण भागात याचे पालन करणे खूप परवडते.

गिनी फाऊलचे वैशिष्ट्ये :-
गिनी फाऊलचे अंडे कोंबड्यांच्या अंड्यांपेक्षा कठिण असतात. या मजबुतीमुळे ते लवकर फुटत नाहीत त्यामुळे हे अंडे टिकून राहण्याची शक्यता जास्त असते. कोंबडीचे अंडे बाहेरच्या वातावरणात ७ दिवसात खराब होतात. पण गिनीचे अंडे १५ ते २० दिवसापर्यंत टिकून राहतात. बिहार सारख्या ठिकाणचे कित्येक शेतकरी गिनी फाऊलचे पालन करून जास्तीचा नफा कमावत आहेत. या पक्ष्यांच्या मांसाची मोठ्या शहरात जास्त मागणी आहे.
जर शेतकऱ्यांना गिनी पालनाची सुरुवात करायची असेल तर ५ किंवा १० पक्षी सुद्धा पुरेसे असतात. यांची किंमत ही १७ ते १८ रुपये असते. म्हणजेच पक्षी आणि आवश्यक गोष्टी पकडून फक्त ५०० रुपयांमध्येसुद्धा हा उद्योग सुरु करता येतो. हे पक्षी बाहेर चरु शकतात यामुळे खाद्याचा पैसा वाचतो. यांचे वजन १२ आठवड्यात दीड किलो होत असते. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान यांचे उत्पादन होते. या काळात हे पक्षी ९० ते १०० अंडे देत असतात.
हे पक्षी दिवस मोठा असेल आणि रात्री तापमान अधिक असेल तेव्हाच अंडी देतात. पण केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थेच्या एका नव्या शोधानुसार हिवाळ्यातसुद्धा हे पक्षी अंडे देतात. कोणत्याही विशेष खर्चिक गोष्टी न करता केले जाणारे गिनी फाऊलचे आपल्याला पालन करायचे असेल तर बरेली मधल्या केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेशी आपल्याला संपर्क करता येईल.
अशाप्रकारे कमी जागेत आणि कमी खर्चामध्ये आपल्याला कोणताच वेगळा खर्च न करता गिनी फाऊलचे पालन करता येते. शेतकऱ्यांनी हा जोडधंदा सुरु केला तर येणाऱ्या काळात एक प्रमुख व्यवसाय म्हणून सुद्धा गिनी फाऊलचे पालन फायदेशीर ठरेल.

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *