सोयाबीनच्या भरघोस उत्पादनाकरीता गंधकाचा वापर अत्यंत आवश्यक
__डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाअंतर्गत असलेल्या मृदा विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातील अखिल भारतीय समन्वयीत सुक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रकल्पामार्फत बुलढाणा जिल्हयातील बुलढाणा, कोलवड आणि साखळी गावातील एकूण दहा शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषिय प्रात्यक्षिकांव्दारे गंधक या खत वापराच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे.
सोयाबीन हे बुलढाणा जिल्हयातील मुख्य पिके झाले असून मागील दहा बारा वर्षापासून हे दोन्ही पिके सातत्याने शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येत आहेत. या अनुषंगाने प्रथम रेषिय प्रात्यक्षिकाव्दारे सोयाबीन या पिकांवर गंधक या खताचा वापर करुन शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. संशोधनाअंती असे लक्षात आले की शेतकऱ्यांकडून सोयाबीन या पिकाला नत्र, स्फुरद आणि पालाश या खतांचा वापर प्रामुख्याने केला जातो, त्यामुळे सुक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्यांकडे दुर्लक्ष होते. दिवसेंदिवस गंधक विरहीत रासायनिक खतांचा असंतुलित वापर आणि सेंद्रिय घटकांचा कमी वापर यामुळे गंधकाची कमतरता वाढत चालली आहे. सोयाबीन या पिकांमध्ये प्रथिने आणि तेलाचे प्रमाण वाढविण्याकरीता गंधक या अन्नद्रव्याचे फार मोठे कार्य आहे. पण गंधकाच्या अभावामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली आहे. निवड करण्यात आलेल्या शेतक-यांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा केले असून त्यांना जमीनीतील मुख्य, दुय्यम आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये इत्यादी मिळून एकूणे ९ घटकांची तपासणी करुन ‘जमीनीची आरोग्य पत्रिका’ विनामुल्य देण्यात येणार आहे. हयाचबरोबर शेतकऱ्यांचे विविध प्रशिक्षण वर्ग घेऊन त्यांना विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाबाबत अवगत केले जाणार आहे. शेतकऱ्यांना विद्यापिठामार्फत सोयाबीन घेणाऱ्या एकुण दहा शेतकऱ्यांना प्रथम रेषिय प्रात्यक्षिकाव्दारे बेन्टोनाईट सल्फर देण्यात आले आहे.