लिंबूवर्गीय फळबागेतील रोगाचे व्यवस्थापन
लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये भारतात महाराष्ट्राचा पाहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील अंदाजे १.२७ लाख हेक्टर क्षेत्र लिंबूवर्गीय पिकाखाली आहे. लिंबूवर्गीय पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक ठरते. त्यामुळे महाराष्ट्रात संत्रा , मोसंबी , कागदी लिंबू यांचे लागवडीचे प्रमाण वाढत आहे. लिंबूवर्गीय फळास बाजारभाव देखील चांगला मिळतो. परंतु बहुतांशवेळा या पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. अश्या वेळेस पिकाची योग्य पद्धतीने काळजी घेणे महत्वाचे ठरते. या पिकावर विषारीजन्य, बुरशीजन्य, जिवाणूजन्य रोग आढळून येतात. यांपैकी सर्वात जास्त प्रादुर्भाव पायकूज, डिंक्या या बुरशीजन्य रोगाचा दिसून येतो. या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखणे थोडे कठीण जाते. त्यामुळे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. आपण आज जाणून घेऊयात लिंबूवर्गीय फळावरील किडी, रोगाचे एकात्मिक नियोजन कसे करावेत.
रोगाचे लक्षणे –
१. रोगग्रस्त कलमाची लागवड केल्यास तो रोग पिकासोबत वाढत जातो. जमिनीलगतचे पाने कुजत जातात. शिरा पिवळ्या पडून पिकाची वाढ खुंटते.
२. झाडांच्या मुळांची दुर्गंधी येते.
३. झाडाच्या बुंध्यावर चीर पडून त्यातून पातळ डिंकाचा स्त्राव बाहेर येतो.
४. जास्त पाऊस पडल्यास पानगळ , फळकूज होण्यास सुरुवात होते.
५. नवीन फुटलेल्या फांद्या वाळण्यास सुरुवात होऊन हळूहळू पूर्ण झाड वाळू लागते.
एकात्मिक व्यवस्थापन –
१. झाडाच्या बुंध्यांना पाणी लागू नये म्हणून झाडाच्या बुंध्याभोवती २ वर्तुळाकार आळे तयार करून त्यामधून पाणी द्यावे.
२. लागवड करतांना कलमजोड जमिनीपासून २० ते २५ सेमी उंचीवर असावेत.
३. अतिभारी निचरा न होणाऱ्या जमिनीत या पिकांची लागवड करू नये.
४. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
५. पावसाळ्यात पाणी साठू नये यासाठी झाडाच्या २ ओळीत चर खोदावेत.
६. झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नयेत.
७. आंतरमशागत करतांना झाडाच्या खोडास, मुळास इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
८. रोगाची लक्षणे दिसताच क्षणी ट्रायकोडर्मा हार्जियनाम, सुहोमनास फ्लुरोसन्स , ट्रायकोडे व्हिरीडी प्रत्येकी १०० ग्रॅम प्रति झाड १ किलो शेणखतात मिसळून झाडास परिघात करून सहनशील खुंटाचा वापर करावा.
९. कुजलेले मूळ छाटून नष्ट करावेत.
१०. पायकूज ग्रस्त भाग चाकूने खरडून काढून त्याठिकाणी बोर्डो पेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड लावावेत.
शक्यतो रोग , किडीचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी वेळीच लक्षणे ओळखून त्यावर उपाययोजना करावीत.