कमी वेळात जास्त उत्पादन देणारे घेवडा लागवड
उत्तर भारतात राजमा म्हणून तर महाराष्ट्रात घेवडा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भाजीची लागवड पद्धतीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. शेंगवर्गीय भाजीपाल्यामध्ये घेवडा हे कमी दिवसात जास्त उत्पादन देणारे पीक आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे, नाशिक, सातारा , सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात घेवड्याची लागवड मोठ्या संख्येने केली जाते. महाराष्ट्रातील अंदाजे ३१०५० हेक्टर क्षेत्र घेवडा लागवडीखाली आहे. घेवड्याच्या शेंग्यांची भाजी तर सुकलेल्या दाण्यांची उसळ बनवली जाते. जनावरांचा चारा म्हणून घेवडयाच्या पानांचा उपयोग केला जातो. घेवडा शेंगामध्ये अ , ब जीवनसत्वे , खनिजे, लोह, चुना , प्रथिने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.
जमीन व हवामान –
१. हलक्या ते मध्यम जमिनीत या पिकाची लागवड करता येते.
२. पाण्याचा उत्तम निचरा करणाऱ्या जमिनीची निवड करावी.
३. जमिनीचा सामू ५.५ ते ६ च्या दरम्यान असणाऱ्या जमिनीत या पिकाची लागवड करावी.
४. अतिउष्ण तसेच अतिथंड हवामान या पिकास मानवत नाही.
पूर्वमशागत –
१. लागवडीपूर्वी जमिनीची उभी आडवी नांगरणी करून घ्यावी.
२. कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
३. हेक्टरी ४० ते ४५ बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळावेत.
वाण –
१. पुसा पार्वती
२. ५ जंपा
३ फुले सुयश
४. व्ही. एल
५. पंत अनुपमा
६. कंटेन्डर
बियाणे –
१. प्रति हेक्टरी ४० किलो बियाणे लागतात.
२. टोकं पद्धतीने लागवड करत असल्यास प्रति हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे लागते.
लागवड-
१. महाराष्ट्रात तीनही हंगामात घेवडा पिकाची लागवड केली जाते.
२. खरीप हंगामात जून , जुलै महिन्यात या पिकाची लागवड करावी.
३. रब्बी हंगामात सप्टेंबर ,ऑक्टोबर महिन्यात या पिकाची लागवड करावी.
४. उन्हाळी हंगामात , फेब्रुवारी महिन्यात या पिकाची लागवड करावी.
५. खरीप हंगामात पाऊस पडून गेल्यावर पाभरीने अथवा तिफणीने पेरणी करावी.
६. पेरणी करतांना दोन झाडातील अंतर ३० सेमी तर दोन ओळीतील अंतर ४५ सेमी ठेवावेत.
उत्पादन-
घेवड्याचे हेक्टरी उत्पादन २७ क्विंटल पर्यंत मिळते.