केळीच्या आवकाबरोबरच दरातही वाढ
खरीप हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हा संकटात सापडला होता. त्यात थंडी ( Winter) वाढल्यामुळे अनेक पिकांच्या मागणीत घट झाली होती त्यात केळी ( Banana) फळाचा सर्वात जास्त वाटा होता. आता मात्र थंडी थोडी कमी होत असल्यामुळे केळीच्या मागणीत पुन्हा वाढ होतानाचे चित्र दिसत आहे. मध्यंतरी मराठवाड्यासह खानदेशात केळी पिकांवर बदलत्या हवामानाचा परिणाम झाला होता तसेच मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. याचा परिणाम केळी उत्पादनावर झाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. वाढत्या थंडीमुळे केळीच्या मागणीत घट झाली होती. आता वातावरण (Weather) तापण्यास सुरुवात होत असल्यामुळे केळीची मागणी होत आहे. तसेच असे वातावरण केळीस पोषक ठरत असल्यामुळे असेच वातावरण कायम राहिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
आवकाबरोबरच दरात ही सुधारणा
वाढत्या थंडीमुळे केळीची मागणी कमी झाली होती. आता मात्र बदलते हवामान पाहता केळीच्या मागणीत वाढ होतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर केळीची आवक देखील वाढली आहे. मध्यंतरी केळीची आवक वाढली होती मात्र त्याचे दर हे कमी होते. आता मात्र चित्र बदलले आहे केळीच्या आवक बरोबर त्याचे दर देखील वाढले आहेत. सध्या केळीचा प्रति क्विंटल ४३० ते ८५० असा दर असून जळगावमध्ये प्रति दिवशी १६ टन केळीची आवक सुरु आहे. मागील काही दिवसांपासून केळीची आवक वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
खानदेशातील केळी ही जगभर प्रसिद्ध असून सध्या पंजाब, दिल्ली, काश्मीर मधून खानदेशातील केळीची मागणी होत आहे. दरात सुधारणा झाल्यापासून उत्तरेकडील अनेक राज्यातून केळीस मागणी वाढली असून दरात अशीच सुधारणा होत राहिल्यास लवकरच परदेशातून देखील केळीची मागणी होण्यास सुरुवात होईल अशी आशा शेतकरी करत आहेत.