शेतकऱ्यांना ‘तेलबिया’ मिळणार मोफत..!
कोरोनाचे वाढणारे संकट, सगळ्याच गोष्टींमध्ये वाढत जाणारी महागाई बघता खाद्यतेलाच्या किंमती झटकन कमी होण्याची शक्यता कमी आहे. यावर सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यानुसार शेतकऱ्यांना तेलबिया बियाणे मोफत देण्यात येणार आहे. ज्यामुळे लोकांना माफक दरात खाद्यतेल उपलब्ध होऊ शकेल. कृषी मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे, की येत्या खरीप हंगामासाठी तेलबिया बियाणे मोफत देण्यात येईल. देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार साधारण ८ लाख सोयाबीन बियाण्यांचे मिनी कीट आणि ७४ हजार शेंगादाणा बियाण्यांचे कीट देणार असल्याचे माध्यमाच्या एका वृत्तात म्हटले आहे. देशातील ४१ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
वर्षभरात साधारणपणे तेलांच्या किमतीत तब्बल ६२% वाढ झाली आहे. एक लिटर मोहरीच्या तेलासाठी १७० रुपये मोजावे लागत आहेत. फक्त एका वर्षात मोहरीच्या तेलाच्या किमतीत ५० रुपये वाढ झाली आहे. शेंगादाणा तेल, सोयाबीन तेल, पाम तेल आणि सूर्यफूल या तेलाच्या पण किमती वाढल्या आहेत.
राज्य सरकारने खाद्यतेलांच्या किमती कमी करण्यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करावेत, अशा सूचना होत्या. पण, कोरोनाच्या नियोजनात अडकलेल्या राज्यांनी अजूनसुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे अजूनही तेलांच्या किमती जास्तच आहेत. तेलाचे उत्पादन कमी असल्यामुळे भारत दरवर्षी ७० टक्के खाद्यतेल आयात करतो. यात करोडो रुपये खर्च होतात. यासाठी आता देशातच तेल उत्पादन वाढवून तेलाच्या किमती कमी करता याव्या यासाठी प्रयत्न चालू आहेत. असे असताना, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची मागणी वाढली आहे. चीन सध्या मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्यामुळे बाकीच्या देशांना कमी प्रमाणात तेल मिळत आहे. तुटवडा होत असल्याने तेलाच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. याचा फटका भारतासोबतच बाकीच्या देशांना बसत आहे.
व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क