पिकपाणी

मोगरा लागवड देईल १० वर्षांपर्यंत भरघोस उत्पन्न

Shares

फुलांची बाजारपेठ सर्वत्रच जोरात आहे, मोग-याची शेती हा फुलशेतीत शेतक-यांना चांगला पर्याय ठरू शकेल.मोगरा आहे एक सुगंधित फुल आहे. साधारणतः मोगर्‍याचा रंगाचा विचार केला तर हे पांढऱ्या रंगाचे फूल असते. मोगर्‍याचा उगमाचा विचार केला तर हे भारतीय झाड आहे. भारतामधून त्याचा विस्तार इतर देशांमध्ये झाला. वेलीसारखे असणारे मोगर्‍याचे झाडाचे कालांतराने झुडपांमध्ये विस्तार होतो. मोगऱ्याच्या फुलाचे अनेक उपयोग आहेत. जसे की, मोगऱ्यापासून सुवासिक अत्तर बनवले जाते. ही बाग एक वेळ केली की सलग १० वष्रे उत्पादन घेता येते. या शेतीला पाणी कमी प्रमाणात लागते. जनावरांकडून मोग-याला धास्ती नसते. यात शाश्वत उत्पन्न मिळत असून बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे हमीभावही चांगला मिळतो.

मोगरा फुलाचे फायदे –
१. मोगऱ्याची फुले ही बरेच काळ टवटवीत राहतात अगदी उष्ण हवामानात सुद्धा.
२. मोगऱ्याचा उपयोग औषधी गोष्टीसाठी होत असतो.
३. मूत्ररोग, ताप, इन्फेक्शन आणि मोगऱ्याचे चहा दररोज पिल्याने कॅन्सरसारखा आजार दूर होण्यास मदत होते.
४. जखम झाली असेल किंवा खरचटणे किंवा फोड आल्यास त्यावर केल्याने त्वरित आराम मिळतो. ५. मोगऱ्या पासून आणि विविध प्रकारचे तेलही बनवले जातात.
६. मोगऱ्याचा उपयोग अनेक प्रकारचे शाम्पू, साबणात केला जातो.

जमिन व हवामान –
१. मोगरा लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी, ६० सें.मी. खोलीची आणि ६.५ ते सात सामू असलेली जमीन निवडावी. हे बहुवार्षिक पीक आहे.
२. जमिनीत चुनखडी नसावे .
३. जमीन चांगला निचरा होणारी असावी.
४. जर मुरमाड आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन जर असली तर मोगरा पीक उत्तम येते.
५. मोगरा पिकाला जास्त थंडी चालत नाही.
६. अगदी स्वच्छ वातावरणात मोगरा चांगला येतो. ७. तसेच मोगऱ्याची चांगली वाढ होण्यास २५ ते ३५ डिग्री सेंटीग्रेड तापमान योग्य ठरते.

पूर्वमशागत –
१. साधारणत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीत जमीन २५ ते ३० सेंटिमीटर खोल नांगरून घ्यावी.
२. त्यानंतर तीन कुळवाच्या पाळ्या घालून जमीन चांगली सपाट करून घ्या.
३. नंतर ५ बाय ५ फूट अंतरावर १ बाय १ बाय १ फूट आकाराचे खड्डे खोदावेत.
४. नंतर हे खड्डे भरताना तळाशी वाळलेले गवत काडीकचरा सहा इंचापर्यंत भरावा.
५. नंतर एक पाटी पूर्ण कुजलेले शेणखत किंवा एक मुठभर गांडूळ खत टाकून खड्डा भरून घ्यावा.

लागवड कालावधी –
१. जर मोगऱ्याच्या लागवडीचा विचार केला तर साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर किंवा जून जुलै महिन्यामध्ये मोगरा फुल शेतीची लागवड करणे उत्तम असते.
२. जर मोगऱ्याच्या एकरसाठी रोपांच्या संख्येचा विचार केला तर कमीत-कमी ४ हजार ५०० रोपे एका एकरसाठी लागतात.
३. लागवड करताना दोन वाफ्यांमधील अंतर ५ फूट आणि दोन रोपांतील अंतर दोन फूट असणे आवश्यक असते.

मोगऱ्याच्या जाती –
१. मोतीचा बेला- या जातीच्या मोगऱ्याची कळी गोलाकार असते आणि फुलात दुहेरी पाकळ्या असतात.
२. बेला- या जातीच्या मोगऱ्याच्या फुलाला दुहेरी पाकळ्या असतात परंतु त्या जास्त लांब नसतात.
३. हजर बेला- या जातीच्या मोगर्‍याला एकरी पाकळ्या असतात.
४. शेतकरी मोगरा- या प्रकारच्या मोगऱ्याला चांगल्या प्रतीच्या पाकळ्या येत असून हार व गजरे याकरता वापरला जातो.
५. बटमोगरा- बटमोगरा जातीच्या कळ्या आखूड असून कळ्या चांगल्या टणक फुगतात.

खत व्यस्थापन –
१. जेव्हा मोगरा लागवडीच्या आधी आपण जमीन तयार करावी, तिची मशागत करावी.
२. तेव्हा एका एकरसाठी ८ टन शेणखत १८० ते २०० किलो एस. एस. पी खत, २०० किलो नीम पेंडल, १२५ किलो करंज पेंडल इत्यादी प्रकारच्या खतांचा उपयोग करावा.
३. तसेच तीनशे किलो सुफला खताचा वापर करावा.

तोडणी तंत्र –
१. मोगरा उत्पादन चालू झाल्यानंतर मोगरा फुलांची तोडणी सकाळी सात ते नऊच्या दरम्यान करणे फायद्याचे असते.
२. तोडणी केल्यानंतर त्याची उत्तमप्रकारे पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवावी लागतात.
३. जर मोगर्‍याचा मार्केटमध्ये भावाचा विचार केला एका किलोला २०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळतो.
४. एका एकर मागे २५ किलो दररोज मोगऱ्याच्या कळ्या मिळतात.
५. लागवड केल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये छाटणी करावी लागते.
६. जर आपण विचार केला तर आठ महिन्यांमध्ये सरासरी ६ टन उत्पादन अपेक्षित असते.

मोगरा हे असे फुल आहे या पासून अनेक पदार्थ , वस्तू बनतात त्यामुळे या फुलास हमखास मागणी आहे . तुम्ही निश्चिंतपणे याची शेती करू शकता आणि १० वर्षा पर्यंत याचे पीक घेऊ शकता .

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *