आता पाण्यातून बना लखपती…!
व्यवसाय किंवा कुठल्याही प्रकारचा उद्योग सुरु करायचा झाला तर आधी प्रश्न येतो भांडवलाचा आणि त्यानंतर ते भांडवल त्या उद्योगातून वसूल करण्याचा. पण अजून थोडा विचार करा आणि बघा की आपल्याला पाण्यातून पैसा कमावता आला तर? आणि ते ही अगदी कमी भांडवलात ! हो हे शक्य आहे विशेष अश्या मत्स्यपालनातून. माशांची मागणी बाजारपेठेत चांगली असून आपल्याला माशांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. माशांच्या अनेक प्रकारांपैकी तुम्ही ‘ट्राउट फिश’ हे नाव ऐकले आहे का? हे मासे गोड्या पाण्यात पाळले जातात. या माशांमध्ये असणाऱ्या औषधी आणि पोषक गुणांमुळे मार्केटमध्ये या माशांची मागणी जास्त आहे. मोठमोठाल्या हॉटेल्स मध्ये या माशांना मागणी आहे. या प्रजातीचे मासे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाळले जातात.
चला हिशोब लावूया :-
एक किलो मासे पाळायचे असल्यास त्याला लागणाऱ्या खर्चाचा विचार केला तर सुमारे एक किलो ट्राउट फिश तयार होण्यासाठी ४०० रुपये लागतात. पण मोठ्या शहरांमध्ये माशांचा एक किलोचा दर जवळपास ७०० रुपये प्रति किलो आहे. या एक किलो मत्स्य पालनासाठी लागणाऱ्या ४०० रुपयांमध्ये माशांना लागणाऱ्या खाद्याचा खर्च आहे. ते खाद्य परदेशातून आयात करावे लागते.
थंड पाण्यात ट्राउट माशाचा वाढीचा वेग कमी असतो.त्यांना विक्रीच्या योग्य होण्यासाठी जवळपास दीड वर्ष लागतात. या माशाचे वजन जवळपास १-३ किलो दरम्यान असू शकते. काही मासे ५-८ किलोपर्यंत सुद्धा वाढतात, पण हॉटेल्समध्ये जास्त वजनाच्या माशांना जास्त मागणी नाही म्हणून मासे लहान असताना हॉटेलमध्ये दिली जातात. मत्स्यउद्योगासाठी शासनाकडून मदत सुद्धा मिळते. मासे पाळण्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी आधी २० हजार रुपये सहाय्य मिळत होते, पण आता सरकारकडून यासाठी १.५ ते २ लाख रुपयांचे कर्ज मिळते. त्यासोबतच लागणाऱ्या इतर सर्व गोष्टींसाठी वेगळे सहाय्य मिळते. जर आपण मासे पाळण्यासाठी लागणारी जागा आणि त्यांना लागणारे खाद्य यांची रक्कम एकत्र केली तर सरकारकडून आपल्याला ३ ते ३.५ लाख रुपये मिळतात. यामुळे मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होताना दिसतो.
अशाप्रकारे झपाट्याने मागणी वाढत असणाऱ्या ‘ट्राउट फिशचे’ पालन केले तर कमी काळात लखपती होणं हे सुद्धा सहज शक्य आहे.
व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क