कोणती खते ठरतात फायदेशीर !
भारतामध्ये पूर्वी पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय खतांचा वापर करून शेती केली जात होती.परंतु सध्याच्या काळात सेंद्रिय खताचा वापर अत्यंत कमी झाला असून रासायनिक खतांचा वापर वाढत चालला आहे .रासायनिक खते जास्त खर्चिक असून त्याचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. रासायनिक खतांचा वापर , त्यापासून उध्दभवणारे धोके पाहता सेंद्रिय खतांचा वापर करण्याची आज काळाची गरज झाली आहे.
रासायनिक खतांचा वापर करणे म्हणजे विषयुक्त अन्नपुरवठा करणे. रासायनिक खतांवर होणार खर्च वाढत चालला असून उत्पादन पुरेसे होत नसल्या कारणाने शेतकऱयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहेत. हे सर्व जर थांबवायचे असेल तर नैसर्गिक पद्धतीने म्हणजेच सेंद्रिय खतांचा वापर करणे अनिवार्य आहे. रासायनिक खतांचा सर्वाधिक वाईट परिणाम जमिनीवर होत आहे. जमिनीचा दर्जा खालावत असून जमिनीची कस कमी होत आहे.सेंद्रिय खत आपण घरी तयार करू शकतो. सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढून पीक चांगले येते.
आपण जाणून घेऊयात सेंद्रिय खत म्हणजे नेमके काय?
वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत निर्माण होते त्यास सेंद्रिय खत असे म्हणतात. यामध्ये कंपोस्ट खत , शेणखत ,गांडूळ खत , हिरवळीची खते , हाडांचे खते आदींचा समावेश होतो. ही शेती पर्यावरणास अनुकूल ठरते. सेंद्रिय खतातून पिकास उपयुक्त लोह , पालाश , स्फुरद , गंधक , जस्त ही सूक्ष्मद्रवे मिळतात.
सेंद्रिय खताचा वापर केल्यास पिकांची चांगली वाढ होऊन निरोगी पीक मिळते आणि पैशांची मोठ्या प्रमाणात बचत होते.सेंद्रिय खतांचा वापर करणे कधीही फायदेशीर ठरते.