कारल्याच्या वेलीस आधार द्या, उभारा मंडप पद्धतीचा वापर करून !
कारले वेलवर्गीय पिकांमधील एक महत्वाचे पीक आहे. कारले कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. कारल्यामधे अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. कारल्याचे नियमितपणे सेवन केल्यास मधुमेह तसेच हृदयासंबधित विकार नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे भारताबरोबरच परदेशात देखील यास मोठ्या संख्येने मागणी आहे. आपण आज कारले पिकाच्या वेलीला आधार देण्यासाठी मंडप उभारण्याच्या पद्धतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मंडप उभारण्याची पद्धत –
१. मंडप पद्धतीमध्ये एक मीटर अंतर देऊन कारल्याची लागवड करतात. अडीच मीटर अंतरावर रिजनेसरी पाडावी लागते.
२. जमिनीच्या उताराचा अंदाज घेऊन दर ५ ते ६ अंतरावर आडवे पाट पाडून रान व्यवस्थित बांधून घ्यावेत.
३. शेताच्या सर्व बाजूंनी ५ मीटर अंतरावर १० फूट उंचीचे ४ उंच जाडीचे लाकडी डांब शेताच्या बाहेरील बाजूला झुकतील अश्या पद्धतीने २ फूट जमिनीत गाडावेत .
४.डांब जमिनीत लावल्यावर कुजू नये यासाठी त्याच्या खालच्या बाजूस डांबर लावावेत.
५. प्रत्येक खांबास बाहेरच्या बाजूने १० गज तारेने ताण द्या. १ ते २ फूट लांबीच्या दगडास दुहेरी तार बांधून तो दगड जमिनीत २ फूट पक्का गाडावा .
६. मंडप उभारण्याचे काम हे वेल एक ते दीड फूट उंचीची होण्यापूर्वी पूर्ण करावेत.
७. साडेसहा ते साडेसात फूट लांब सुतळी घ्यावी त्याचे एक टोक तारेस तर दुसरे टोक वेलीच्या खोडाजवळ तिरपी काडी रोवून त्या काडीस बांधावेत.
८. वेलींना आधार , वळण देणे आवश्यक आहे.
९. जमिनीत बिया टाकल्यापासून ८ ते १० दिवसात वेल येण्यास तयार होते.
१०. दोरीच्या हेलकाव्याने वेल खाली पडणार नाही याची काळजी घ्यावी.
११. वेल वाढत गेल्यास मांडवायच्या तारेवर आडव्या पसरून घ्याव्यात.
अश्याप्रकारे उभारा मंडप पद्धतीच्या साहायाने कारले पिकाच्या वेलीस आधार द्यावे. जेणेकरून पिकाची वाढ उत्तम होईल.