पशुधन

जनावरे विकत घेताय ? ही काळजी आपण घेतली का ?

Shares

शेतीसोबतच वेगवेगळे जोडधंदे करताना कित्येक जण दूध व्यवसाय करतात असे आपल्याला दिसून येते. हा व्यवसाय करण्यासाठी जनावरे विकत घेताना बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक भाग म्हणजे शेतकऱ्यांची गरज, आर्थिक क्षमता, पाणी आणि हिरव्या चारा या गोष्टी उपलब्ध असायला हव्यात. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आपल्याला आवश्यक असणारी जनावरे निवडतो. जनावरे ही फक्त दूध व्यवसायासाठी पाळायची झाल्यास म्हैस पालन करणे नेहमीच फायदेशीर ठरते.

आपला दूध व्यवसाय सुरु करताना जनावरांची निवड कशी करावी?

• जनावरांचा पाठीचा कणा हा सरळ असावा, तो वाकलेला असू नये. जनावरांच्या बरगड्या जास्त दिसत असल्यास ते अशक्त असतात.

• गाईचा विचार करता गाईच्या पोटाचा तसेच छातीचा भाग लांब, खोल आणि रुंद असावा. उत्तम खाद्य पचवण्याची क्षमता असलेल्या जनावरांची निवड करावी. कास आणि सडाची तपासणी करावी. सड काशेच्या प्रत्येक चतुर्थांश प्रमाणबद्ध असावी. काटकोनात स्थित असावेत. मागील कास रुंद, उंच आणि घट्टपणे शरीराशी जोडलेली असावी. किंचित वर्तुळाकार पद्धतीने मुळास जोडलेली असावी. कासेची रचना बऱ्यापैकी प्रमाणाबद्ध असावी. पुढची कास घट्टपणे संलग्न असून त्याची लांबी मध्यम असावी. सड दंडगोलाकार, एकसमान आकाराचे आणि मध्यम लांबीचे असावे. कासेस चार व्यतिरिक्त अधिक सड असू नये. सडातून हृदयाकडे जाणारी रक्तवाहिनी प्रशस्त व फुगीर असावी.

• जनावरांच्या दाताची पाहणी करून वयाची खात्री करावी. या वयातील जनावरे चार दाती असतात. जनावरांमध्ये गर्भपाताच्या घटनेचे प्रमाण तसेच कासदाह या आजाराचा प्रादुर्भाव कधी झाला होता का याची माहिती घ्यावी.

• जनावरांचा बऱ्याच आजारांचे जनावरांच्या बाहेरील शरीर लक्षणांवरून निदान करता येऊ शकते. जसे की, डोळ्यांतून आणि नाकातून स्राव येणे हे जनावर आजारी असल्याचे लक्षण आहे. त्याबरोबरच योनीमार्ग किंवा गुदद्वारातून रक्तस्राव येणे, हे योनीच्या आजाराचे लक्षण आहे. आजारी जनावर सुस्त, मलुल आणि अशक्त झालेले असते. काही आजारांमध्ये बाहेरून लक्षणे दिसून येत नाहीत. आजारापासून वाचण्यासाठी जनावरांचे नियमित लसीकरण केले जात असल्याची खात्री करावी. त्यासोबतच जनावरांचे पशु वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याचा आग्रह करावा.

• आपल्याकडे होल्स्टिन संकरित आणि जर्सी संकरित गाई या गाईंचे प्रकार दिसतात. होल्स्टिन गायीचे दुधाचे प्रमाण जास्त असते. तर जर्सी संकरित गाईच्या दुधात स्निग्धाचे प्रमाण जास्त असते. आवश्यकतेप्रमाणे जर्सी किंवा होल्स्टिन गाईची निवड करावी. जर्सी संकरित गाई डोंगराळ भागात संगोपनासाठी चांगल्या आहेत तर होल्स्टिन संकरित गाईंचे संगोपन पठारी भागात करावे.

     अशा सर्व प्रकारच्या गोष्टी आपण जनावरांची खरेदी करताना तपासायला हव्यात आणि आपल्या व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार खबरदारी घेऊन जनावरांची निवड करायला हवी. असे केल्यास आपण आपल्या दूध व्यवसायात जास्त फायदा घेऊ शकतो आणि घेतल्या गेलेल्या सर्व काळजीमुळे जनावरांचे आरोग्यसुद्धा दीर्घकाळ चांगले राहते. 
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *