घरगुती उपाय करून असे बरे करा जनावरांचे त्वचा रोग !
माणसांप्रमाणे जनावरांना देखील काही रोग ,आजार ,विकार असतात. त्या मधून सर्वात जास्त होतो तो त्वचा विकार . त्वचा विकाराचे प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांचे जनावरांच्याकडे झालेले दुर्लक्ष आणि विकाराचे अयोग्य निदान. शेतकऱ्यांना असे काही विकार किंवा त्यांचे लक्षणे दिसून आल्यास शेतकऱ्यांनी प्राथमिक स्वरूपातील त्वचा विकाराचे निदान आणि उपचार पशुवैद्यकाद्वारा (डॉक्टर )करावेत.
त्वचेवर एखादा चट्टा किंवा पुरळ येतात, त्या भागास खाज सुटणे, गोठ्यातील भिंतीस अथवा खांबास जनावर अंग घासतात त्याने त्वचा रोगग्रस्त भाग लाल होतो. ही त्वचा विकाराची सुरवातीची लक्षणे असतात . यावर योग्यवेळी उपचार न केल्यास जिवाणूंचा संसर्ग होऊन या आजाराची तीव्रता वाढते आणि तो विकार अजून पसरतो . त्वचा विकारांवर उपचार करण्यापूर्वी त्याचे योग्य निदान होणे आवश्यक आहे. परोपजीवी जंतूंमुळे होणाऱ्या त्वचाविकाराची अजून बरीच कारणे आहेत. त्यासाठी काही उपयुक्त औषधी वनस्पती पुढील प्रमाणे –
कडूलिंब
लिंबोळी, कडूलिंबाची पाने अनेक आजारांवर औषधी स्वरुपात वापरली जाते . कडूलिंबाचे तेल हे त्वचा विकारांवर अत्यंत गुणकारी आहे.
कडूलिंबांमध्ये जीवाणू, परोपजीवी जंतू व बुरशी विरोधी गुणधर्म असल्यामुळे जवळपास सर्व प्रकारांतील त्वचा विकारांत कडूलिंबाचा अत्यंत चांगला उपयोग होतो.
कडूलिंबामुळे बाह्य परोपजीवी जसे की उवा, गोचिड कमी होण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे त्वचा विकाराचा प्रादुर्भावदेखील कमी होतो.
कडूलिंबाचे तेल त्वचा विकारांवर बाहेरून लावावे.
करंज
करंज किंवा करंजी या नावाने ओळखली जाणारी वनस्पती गुणकारी असते .
करंजीच्या तेलातदेखील परोपजीवी जंतुविरोधी व बुरशीविरोधी गुणधर्म आहेत.करंजी तेलाचा वापर बाह्योपचाराकरिता करावा.
अर्जुन
अर्जुन हा मोठा वृक्ष आहे. याची साल त्वचा विकार आणि रक्तस्रावावर यांवर अत्यंत गुणकारी आहे.
याच्या सालीचा वापर देखील बाह्योपचराकरिता करावा.
हळद
सर्वांच्या घरी सहज उपलब्ध होणाऱ्या हळदीमध्ये जिवाणूविरोधी गुणधर्म आहेत, तसेच हळद सूजविरोधी व दाहनाशक म्हणूनही अत्यंत उपयुक्त आहे.हळकुंडाची पावडर, कडूलिंब, करंज तेलात मिसळून त्वचा विकारांवर लावावी.
कन्हेर
कन्हेर ही वनस्पती फुलांसाठी प्रसिद्ध आहे.वनस्पतीची पाने व मूळ ओले असताना ठेचून त्याचा लेप त्वचा विकारांवर द्यावा.या उपचारामुळे बाह्योपरोपजीवींचे देखील नियंत्रण होते.
तुळस
सर्वांच्या दरवाज्यासमोर असणारी तुळशीची पाने, मंजुळा अथवा यापासून काढलेले तुळशीचे तेल यात जीवाणू व बुरशी विरोधी गुणधर्म आहेत. कन्हेरप्रमाणेच पाने व मंजुळा ठेचून त्याचा लेप त्वचा विकारांवर द्यावा अथवा तुळशीच्या तेलाचा वापर करावा.
वरील सर्व वनस्पतींचा एकत्रित वापर कसा करावा ?
कडुलिंब तेल – 20 मि.लि.
करंज तेल – 20 मि.लि.
अर्जुन – 4 ग्रॅम
हळद – 5 ग्रॅम
कन्हेर – 3 ग्रॅम
तुळस तेल – 10 मि.लि.
वरील सर्व घटक एकत्र करून दररोज 2 ते 3 वेळेस त्वचाविकारांवर लावाव्यात. याने नक्की त्वचा विकार कमी होण्यास मदत तर होईलच आणि थांबण्यास देखील खूप मदत होईल.