हीच खरी वेळ चिकू प्रक्रिया उद्योग करण्याची !
आपल्या राज्यात फळबाग लागवडीमध्ये चिकूची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते. वर्षभर फळे देणारी ही लागवड चांगलाच फायदा देते. चिकूचे फळ लवकर खराब होत असल्यामुळे दूरच्या आणि मोठ्या बाजारपेठेत पाठवताना ही फळे पक्की झाली आहेत कि नाही हे पाहून त्यांची काढणी करावी लागते. काढणी केल्यानंतर फळांची प्रत ओळखून पॅकिंग अगदी काळजीपूर्वक करावे लागते. म्हणजे दूर निर्यात केली जाणारी फळे लवकर खराब होत नाहीत.
चिकू प्रक्रिया:
सर्वांना आवडणारे चिकू हे फळ जास्त काळ टिकून राहत नसल्यामुळे ते बाजारात विक्रीसाठी जास्त काळ टिकून राहावे आणि फळ खराब होऊन नासाडी होऊ नये यासाठी फळांवर प्रक्रिया केली जाते. ज्यामुळे फळांचे आयुष्य वाढते. चिकूपासून बाजारपेठांमध्ये मागणी असणारे बरेच पदार्थ बनावता येतात ज्यात चिकूचा रस, लोणचे, मुरंबा, सरबत, सिरफ, चटणी, बर्फी, चिकू पावडर या गोष्टी बनतात.
चिकूचा आरोग्यदायी रस:
आरोग्यासाठी चांगला असणारा चिकूचा रस बनवण्यासाठी परिपक्व फळांची निवड करणे आवश्यक असते. फळे आधी स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावेत. धुतलेल्या फळांचे स्टीलच्या सुरीने काप पाडून घ्यावेत. देट, कीड लागलेला भाग आणि इतर अनावश्यक वाटणारा भाग काढून टाकावा. फळातील बी वेगळे करावे आणि ज्यूसर मध्ये फळे टाकून त्याचा लगदा बनवावा. लगद्याला पेक्टिन एंजाइमची प्रक्रिया करावी. नंतर त्या मिश्रणाला सेंट्रीफ्यूज करावे. या सर्व प्रक्रियेनंतर चिकूचा रस तयार होतो जो बॉटलमध्ये पॅक करून थेट बाजारपेठेत पाठवता येतो.
चिकूची चविष्ट बर्फी:
चिकूचा रस काढल्यानंतर राहिलेल्या लगद्यापासून चिकु बर्फी हा पदार्थ तयार करता येतो. चिकु बर्फी घरी तयार करण्यासाठी एक किलो साखर, 50 ग्रॅम मक्याचे पीठ आणि 120 ग्रॅम वितळून घेतलेले वनस्पती तूप एकत्र करून शिजवावे. काही वेळानंतर त्यात दोन ग्रॅम मीठ आणि दोन ग्रॅम सायट्रिक ऍसिड टाकावे. बऱ्याच वेळपर्यंत शिजू द्यावे. हे मिश्रण तूप लावून ठेवलेल्या ट्रेमध्ये किंवा परातीत ओतावे आणि एक सेंटीमीटरपर्यंत थर होईल एवढे ओतून एकसमान करावे. थंड होत असताना सुरीने पाहिजे त्या आकाराचे काप पाडून ते बर्फीचे मिश्रण थंड होऊ द्यावे. ही तयार झालेली बर्फी साठवणुकीसाठी ठेवता येते.
चिकूचा स्वादिष्ट जॅम:
पिकलेल्या चिकूच्या गरापासून चांगल्या प्रतीचा जॅम तयार करता येतो. यासाठी चिकूचा गर एक किलो, साखर एक किलो सायट्रिक ऍसिड दोन ग्रॅम हे घटक पदार्थ वापरावेत. सगळे पदार्थ एकत्र मिसळून ठराविक घट्टपणा येईपर्यंत शिजवावेत. शिजवताना मिश्रण सारखे सारखे हलवावे. हे शिजून तयार झालेले मिश्रण गरम असतानाच बाटल्यांमध्ये भरून थंड आणि कोरड्या जागेत साठवावे.
चिकूचा मुरंबा:
चिकूचा मुरंबा मध्यम पिकलेल्या चिकूपासून करता येतो. हा बनवण्यासाठी मध्यम पिकलेल्या चिकू फळांची सालं काढावी. एक किलो चिकूच्या फोडी, एक किलो साखर, दहा ग्रॅम मीठ, दोन ग्रॅम सायट्रिक ऍसिड आणि 25 मिली विनेगर वापरून मुरंबा करतात. सर्वात आधी मध्यम पिकलेली चिकू फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. फळांच्या उभ्या फोडी करून त्यात वरील सर्व पदार्थ मिसळून ते मिश्रण ६८० ते ६९० ब्रिक्स पर्यंत शिजवावे. हे मिश्रण थंड झाल्यावर तयार झालेला मुरंबा गरम असतानाच काचेच्या बाटल्यांत भरावा.
चिकू पावडर:
चिकू पक्का होऊन कडक वाळल्यावर त्याच्या फोडी मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडर मध्ये दळून घ्याव्या. तयार झालेली पावडर १ मिमी छिद्राच्या चाळणीतुन चाळून प्लास्टिक पिशवी मध्ये हवा बंद करता येते. चिकू पावडर पासून चिकू मिल्कशेक हे स्वादिष्ट पेय करता येते.
अशाप्रकारे आपण चिकूवर प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. या पदार्थांना बाजारपेठांमध्ये चांगलीच मागणी आहे आणि विशेष म्हणजे हे उद्योग कोणालाही करता येणं सहज शक्य आहे. लहान स्तरापासून मोठ्या स्तरापर्यंत सर्व प्रमाणात हे उत्पादने बनवता येतात. ज्यामुळे उद्योग प्रक्रियेतून आर्थिक विकास साधला जाऊ शकतो.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क