अहो आश्चर्य ! गीर गाईमुळे आपले जीवन बदलू शकते

Shares

शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात ज्यात दूध देणारी जनावरे बहुतांश ठिकाणी पाळली जातात. ही जनावरे निवडताना आपल्या आवश्यकतेनुसार जनावरांच्या जातीची निवड केली जाते. जनावरांच्या जातीनुसार त्यांच्या उत्पादनाच्या प्रमाणात फरक बघायला मिळतो. त्यामुळे जनावरांची खरेदी करण्याआधी त्यांच्या जाती आणि वैशिष्ट्ये आपल्याला माहित असायला पाहिजे. दुधासाठी पाळल्या जाणाऱ्या गाईंच्या जातींपैकी एक जात म्हणजे गीर गाय !
*ओळख गीर गाईची
गीर ही भारतीय वंशाची गाय आहे. गुजरातमधल्या गीर जंगलात ही जात आढळते म्हणून या गाईला गीर हे नाव पडले असण्याची शक्यता बघायला मिळत. या गायीचे आयुष्य जवळपास 12 ते 15 वर्षे असते आणि या संपूर्ण काळात त्या 6 ते 10 वासरांना जन्म देतात. दुधाच्या भरपूर उत्पादनासाठी ही गाय ओळखली जाते. गुजरातसोबतच, राजस्थान आणि महाराष्ट्रातसुद्धा गीर जातीच्या गायी आढळतात.
*गीर गायीत काय आहे विशेष ?
गीर गायी या पांढऱ्या, गडद लाल किंवा चॉकलेटी, तपकिरी रंगाच्या बघायला मिळतात. यांचे कान लांबट आणि खाली लटकलेले असतात. या गीर गाईचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचे बाहेरच्या बाजूला वाढलेले गोलाकार कपाळ, या ठेवणीमुळे त्यांचे उष्णतेपासून रक्षण होते. गीर गाय मध्यम ते मोठ्या आकारात आढळतात. मादी गीर गाईचे वजन साधारणपणे 385 किलो आणि उंची 130 सेंमी पर्यंत असते तर नर गीरचे वजन साधारणपणे 545 किलो आणि उंची 135 सेंमी असते. त्यांच्या शरीराची त्वचा खूप मुलायम आणि लवचिक असते. शिंगे मागे वाकलेली असतात. या गीर गाईची प्रतिकारशक्ती खूप चांगली असते.
*किती मिळते दूध ?
ही गाय दिवसाला 12-14 लिटर दूध देते. गीर गाईच्या दुधात 4.5 टक्के चरबी असते. एका लॅकटेशन पिरेडमध्ये गीर गाय सरासरी १६०० किग्रा दुधाचे उत्पादन देते. गीर गाय ही प्रत्येक प्रकारच्या हवामानात राहू शकते.
*गीर गाईपासून होणारा फायदा
गीर गाईचे दूध रोग प्रतिकारशक्तीसाठी उत्कृष्ट असते. गीर गायीच्या दुधापासून तयार झालेले तूप हे ब्लड प्रेशर, डायबेटीस, हार्ट अटॅक आणि किडनीच्या समस्या यांमध्ये फायदेशीर ठरते. गीर गाईच्या दुधात व्हिटॅमिन A-2 असते, म्हणून त्याचे दूध लहान मुलांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यासोबतच या गाईच्या जातीच्या मूत्रात ३८८ प्रकारचे रोगप्रतिकार घटक आढळतात, जे बऱ्याच रोगांमध्ये फायदेशीर ठरतात.

*गीर गायीची किंमत
गीर जातीच्या गाय साधारणपणे ९० हजारांपासून ते साडेतीन लाखांपर्यंत उपलब्ध होते. गायीची किंमत दुधाचे प्रमाण आणि गुणवत्ता यांच्या आधारे ठरविली जाते. दुधाची गुणवत्ता गायीला दिल्या जाणाऱ्या पोषण आहारावर अवलंबून असते.

*पालन आणि देखरेख :
सगळ्या प्रकारच्या वातावरणात गाई-गुरांचे संरक्षण करण्यासाठी शेडची किंवा गोठ्याची आवश्यकता असते. गोठ्यामध्ये, स्वच्छ हवा आणि पाणी मुबलक असावे. गोठ्याची जागा प्राण्यांच्या संख्येनुसार मोठी आणि मोकळी असावी जेणेकरुन ते सहजपणे राहू आणि खाऊ शकतील. प्राण्यांच्या कचऱ्याचा एक्झॉस्ट पाईप 30 ते 40 सेमी रुंदीचा आणि 5 ते 7 से.मी. खोलीचा असावा.
*आहार काय द्यावा ?
गीर जातीच्या गायींना आवश्यकतेनुसार खुराक द्यावा. गीर गाई जातीच्या आहारामध्ये पौष्टिक घटक असणे फार महत्वाचे असते, कारण गाईपासून मिळणाऱ्या दुधाची गुणवत्ता ही गाईला दिल्या जाणाऱ्या पोषक आहारावर अवलंबून असते. म्हणूनच, चारा निवडताना, त्याच्या पौष्टिक घटकांकडे लक्ष दिले पाहिजे. गायीच्या आहारामध्ये आवश्यक प्रमाणात ऊर्जा, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे असणे आवश्यक आहे.
गायीला देण्यात येणाऱ्या खुराकामध्ये मका, ज्वारी, बाजरी, चणे, गहू, कोंडा, पोळ्या, कडधान्य या गोष्टींचा समावेश असणे आवश्यक आहे. पशुवैद्यकीय सल्यानुसार गीर गायीला दिल्या जाणाऱ्या आहारात कडबा आणि हिरवा चारा, अश्वगंधा, शतावरी,काळी मिरी, गहू, सुंठ या गोष्टी दिल्या तर गाईच्या दुधाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्हींमध्ये वाढ होते आणि गाईचे आरोग्यसुद्धा चांगले राहते.
अशाप्रकारे गीर जातीची गाय दुधासाठी फायदेशीर ठरते. आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांवर फायदेशीर ठरणाऱ्या तिच्या दुधाला बाजारपेठांमध्ये मागणी आहे. म्हणून गीर गाईचे पालन केल्यास दूध व्यवसायात भरभराट होते हे निश्चित.

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *