आवळा आणि त्यापासून बनणारे पदार्थ..
आवळ्याला मूर्ती लहान कीर्ती महान असे म्हणता येईल.आवळा आकाराने जरी लहान असला तरीही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा समावेश असतो. आवळा हे फळ औषधी गुणधर्माने व त्यातील जीवनसत्व क च्या मात्रेमुळे जगभर प्रसिद्ध आहे.आवळ्यामध्ये इतर खनिजद्रव्ये आणि तंतुमय पदार्थ देखील भरपूर प्रमाणात असतात. आवळ्यापासून बनविलेले अनेक पदार्थ अगदी सहज बाजारात मिळतात. या फळामध्ये तुरटपणा जास्त असल्यामुळे ताजी फळे तशीच खाणे अवघड जाते. या करीता आवळा प्रक्रिया करणे गरजेचे आहे. आवळ्यावर प्रक्रिया करणारे लघु व मध्यम प्रकारचे उद्योग तुम्ही सुरू करू शकता आणि त्यात नफा देखील बराच होतो.
आवळयापासून तयार होणारे काही पदार्थ –
आवळा सुपारी-
१. आवळा सुपारी ही मीठ लावून तयार करतात.
२. हयाकरीता पूर्ण वाढलेली पक्व फळे निवडावीत.
३. ही फळे स्वच्छ पाण्यात धुवून ती ३-४ मिनिटे उकळत्या पाण्यात टाकून थंड करावीत.
४. या फळांचे तुकडे करावेत किंवा किसणीच्या सहाय्याने कीस काढावा.
५. हया किसात ४० ग्रॅम मीठ प्रतिकिलो या प्रमाणात घेवून मिसळावे.
६. सुर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात ६० सेल्सिअस तापमानाला सुपारी वाळवावी.
७. ही वाळवलेली सुपारी वजन करून प्लास्टिक पिशव्यांत भरून विक्रीला पाठवावी.
८. आहारमुल्ये व मुखशुद्धीसाठी ही सुपारी चांगली आहे.
आवळा स्क्वॅश-
१. आवळा रसाचे स्क्वॅश बनविण्यासाठी रसाचे प्रमाण ४५ टक्के टी.एस.एस. ५० टक्के व आम्लता १ टक्का ठेवतात.
२. हे पेय दीर्घकाळ टिकविण्यासाठी त्यामध्ये रासायनिक द्रव्ये वापरतात.
३. आवळा स्क्वॅश बनविण्यासाठी एक ग्लास रस व ३ ग्लास पाणी या प्रमाणात वापर करावा.
आवळा कॅन्डी-
१. आवळा कॅन्डी तयार करतांना मोठया आकाराची पक्व फळे निवडून प्रथम पाण्याने धुवून घ्यावीत.
२. त्यानंतर उकळत्या पाण्यात त्यांना टाकावे.
३. फळे काढून ती थंड होऊ दयावी व सुरीच्या सहाय्याने त्याच्या फोडी करून बी बाजूला करावीत.
४. आवळा मोजून त्यानंतर त्यात १:०.७ असे साखरेचे प्रमाण घेवून झाकण बंद पातेल्यात ठेवून २४ तासांकरीता ठेवावे.
५. दररोज त्यामध्ये साखर टाकून त्याचा ७२ अंश ब्रिक्स वाढवावा व त्यानंतर कॅन्डी काढून वाळवावी. ६. कॅन्डी पॉलीथीन बॅगमध्ये भरून विक्रीसाठी पाठवावी.
आवळा मुरंबा-
१. प्रथम मोठया आकाराची पक्व फळांची निवड करून ती स्वच्छ पाण्याने घ्ाुवून फळांना १०० सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्याची प्रक्रिया १५ मिनिटे द्यावी.
२. त्यानंतर फळे २.५ पेक्टिक एन्झार्इमच्या द्रावणात 4 तासांपर्यंत बुडवून ठेवावीत.
३. हया द्रावणातून फळे बाहेर काढून ती परत पाण्याने धुवून ३५ अंश ब्रिक्स असलेल्या साखरेच्या पाकात २४ तासांपर्यंत बुडवून ठेवावीत.
४. अशा प्रकारे पाकाचा ब्रिक्स दररोज १० ब्रिक्स वाढवावा व शेवटी ७२ ब्रिक्स आल्यावर मुरब्बा तयार झाला असे समजावे.
आवळा लोणचे-
१. मुरंबा करण्याकरिता वापरता येत नाहीत अशा लहान आवळा फळांचा वापर लोणचे तयार करण्याकरिता होऊ शकतो.
२. आवळा फळे ही अत्यंत तुरट व आंबट असतात. त्याकरिता लोणचे तयार करण्याअगोदर आवळा फळे ०.५ टक्के अॅसेटिक अॅसिड व १ टक्का हळद असलेल्या १० टक्के मिठाच्या द्रावणात एक महिण्यापर्यंत ठेवावीत व नंतरच ती फळे लोणचे तयार करण्याकरिता वापरावीत.
३. आवळयाचे लोणचे बनविण्यासाठी आवळयाचे तुकडे १ किलो, मीठ-१५० ग्रॅम, हळद-१०० ग्रॅम, लाल मिरची पावडर-१० ग्रॅम, मेथ्या-३० ग्रॅम व गोडेतेल-३०० मि.ली. इ. घटक पदार्थ वापरावेत.
४. वरील प्रमाणे मिठाच्या द्रावणात बुडवून ठेवलेली आवळा फळे घेवून त्यांना उकळत्या पाण्यात 5 मिनीटे बुडवून नंतर थंड करावी.
५. फळांचे तुकडे करून बिया काढून टाकाव्यात. फळांचे तुकडे व मीठ सोडून बाकी सर्व पदार्थ तेलात परतून घ्यावेत.
६. फळांचे तुकडे व मसाला एकत्र मिसळून पुन्हा दोन मिनिटे परतून घ्यावे व नंतर मीठ मिसळावे.
७. हे तयार झालेले लोणचे काचेच्या स्वच्छ बरणीत भरून बंद केलेलेली रणी उन्हात 5 दिवस ठेवावी.
८. लोणचे मुरल्यानंतर बरणी थंड व कोरडया जागी ठेवावी.
याशिवाय आवळा लाडू, आवळा सुपारी, आवळा पावडर,आवळा जॅम ,आवळा चूर्ण यासारखे इतरही पदार्थ तयार करता येतात.