आरोग्यवर्धक कारल्यापासून तयार करा कारले चिप्स
कारले भारतात सर्वत्र पिकते व अती प्राचीन काळापासून कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केला जातो. कारले चवीने कडू असले तरीही अत्यंत गुणकारी आहे.कारले हिरवट, पांढरसर, काळसर हिरव्या रंगांची आणि पिकल्यानंतर आतून लाल, केशरी होतात. कारली मोठी आणि लहान अशा दोन प्रकारची असतात तर रंगभेदामुळे कारल्याचे पांढरी, हिरवी असे दोन प्रकार आढळतात.
कारल्याचे औषधी गुणधर्म –
१. कारले पित्तशामक, औषधी गुणधर्मामुळे कारले ही शक्तीवर्धक, पुष्ठीकारक व सारक असल्यामुळे आहाराबरोबरच औषध म्हणूनही वापरतात.
२. कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते.
३. खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते.
४. कारल्याचे किंवा कारल्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होते.
५. कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात.
६. कारल्याने पचन क्रिया सुधारते.
७. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवत असल्याने मधुमेहामध्ये कारल्याचे पान हा रामबाण उपाय आहे.
८. कारल्याची पाने खाल्ल्याने साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
९. कारण यामध्ये विसिन आणि पॉलिपेप्टाईड सारखे गुण आढळतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
१०. प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी कारल्याच्या पानातील अ जीवनसत्त्व, ‘सी’ जीवनसत्त्व आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते.
११. त्यामुळे प्रतिकारक्षमता मजबूत होते. ‘सी’ जीवनसत्त्व हे चांगले अँटीऑक्सिडंटस् आहेत, तर ‘बी’ जीवनसत्त्वामुळे शरीराची चयापचय संस्था चांगली राहते.
१२. उच्च रक्तदाबात कारल्याची पाने रोज खाल्याने रक्तदाब सामान्य राहण्यास मदत होते. १३. त्यात पोटॅशिअम आणि कॅल्शिअम असते. त्यामुळे या दोन्ही घटकांचे प्रमाण वाढून रक्तदाब कमी केला जाऊ शकतो.
१४. ही खनिजे उच्च रक्तदाबाला कारणीभूत असणार्या सोडियमची पातळी वाढून किडनीचे होणारे नुकसान टाळता येते.
कारले चिप्स तयार करण्याची पद्धत –
साहीत्य – कारली, लाल मिरचीपूड, मीठ, चाट मसाला,आमचूर पावडर, हळद, तळणीसाठी तेल.
कृती-
१. वाहत्या पाण्यामध्ये कारली स्वच्छ धुऊन घ्यावीत.
२. मऊ स्पंजच्या साह्याने वरील पृष्ठभाग घासून साफ करावा.
३. लांबीच्या बाजूने दोन भाग करून, त्यातील गर व बिया चमच्याने काढून टाकाव्यात.
४. त्यानंतर कारल्याचे पातळ काप करून घ्यावेत.
५. नंतर हे काप मीठ व हळद घातलेल्या उकळत्या पाण्यात टाकावेत.
६. तसेच पाच मिनिट उकळू द्यावेत.
७. आता हे काप चाळणीवर काढावे व वरून थंड पाणी ओतावे.
८. तसेच चाळणीवर निथळत राहू द्यावेत. पाणी पूर्ण निथळल्यावर कापडावर किंवा पेपरवर पसरवून पूर्ण कोरडे होऊ द्यावेत.
९. गरम तेलात मंद आचेवर छान तांबूस रंग येईपर्यंत तळून टिश्यू पेपरवर काढावेत.
१०. सगळे तळून झाले की त्यावर तिखट, मीठ, मसाला व आमचूर पावडर आपल्या चवीनुसार वरून टाकावे आणि अलगद हातानी चिप्स मोडू न देता हलवावे.
११. मस्त कुरकरीत चिप्स तयार.
कारल्याचे अजून काही प्रक्रियायुक्त पदार्थ-
१. कारल्याचा चहा
२. क्रिस्पी कारले चिप्स
३. कारल्याची चटणी
४. कारल्याचे रायते (लोणचे)
५. कारल्याचा रस
६. चिंच गुळाची कारली
७. कारल्याची भाजी
८. कारल्याची पावडर इत्यादी
तर अश्या प्रकारे आपण बघितल कि सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात कारल्याचे चिप्स आपण करू शकतो . ज्याचा उद्योगवाढीसाठी नक्कीच फायदा होईल.