आरोग्यदायी गुलकंद आणि त्याचे पदार्थ
गुलकंद जवळजवळ सर्वांनाच आवडतो आणि त्याचे अनेक फायदे ही आहेत.गुलकंद हा अरबी भाषेतील शब्द आहे असून गुल म्हणजे ‘गुलाब’ आणि कंद म्हणजे ‘साखर’. गुलाबाच्या पाकळ्या साखरेमध्ये मुरल्यावर गुलकंद तयार होतो.
बघुयात गुलकंदसाठी वापरल्या जाणाऱ्या जाती-
१.रजहाँ
२. एडवर्ड
३. एव्हान
४. क्रिमझन
५. ग्लोरी
६. ब्लू-मून
७. मॉटेझुमा
८. हैदराबादी.
–गुलकंद खाण्याचे फायदे:
१. अन्नाच्या नैसर्गिक पचनास मदत करते.
२. शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत.
३. आम्लपित्तावर नियंत्रण ठेवण्यास मदत.
४. गुलकंद कफनाशक, तृष्णानाशक, रक्तवर्धक आहे.
५. गुलकंदाच्या सेवनाने भरपूर प्रमाणात नैसर्गिक कॅल्शियम मिळते.
६. गुलकंद अँटीऑक्साईड म्हणून कार्य करते.
उन्हाळ्यात येणारा थकवा, आळस, सांधेदुखी, जळजळ यावर गुणकारी.
७. नजर चांगली ठेवण्यास मदत करते.
८. ताप, रक्तपित्त, कांजण्या यावर चांगला उपयोग होतो.
गुलकंद तयार करण्याची पद्धत:
साहित्य-
गुलाबाची फुले, खडीसाखर किंवा जाड साखर, गरम पाण्याने स्वच्छ धुतलेली काचेची बरणी.
कृती-
१. गुलाबाची ताजी व पूर्ण उमललेली फुले घ्यावीत. २. पाकळ्या व्यवस्थित तोडून पाण्याने स्वच्छ करून घ्याव्यात.
३. त्या पाकळ्या नंतर कोरड्या होऊ द्याव्यात. पाकळ्यांचे स्टीलच्या कात्रीने बारीक तुकडे करावेत.
४. पाकळ्यांचे तुकडे व साखर १:१ या प्रमाणात घेऊन त्यांचे मिश्रण करावे.
५. हे मिश्रण काचेच्या बरणीत भरावे किंवा बरणीत गुलाबाच्या पाकळ्या व साखर भरताना त्यांचे एकावर एक थर द्यावेत.
६. नंतर बरणीचे तोंड स्वच्छ, कोरड्या व पांढऱ्या फडक्याने बांधावे.
७. ही बरणी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात ठेवावी.
८. बरणी दुपारच्या कडक उन्हामध्ये ठेवू नये कारण बरणी जर कडक उन्हात ठेवली तर गुलकंदाचा सुगंध कमी होईल व त्याचा रंगही काळपट होण्याची शक्यता असते.
९. बरणी कोवळ्या उन्हात ठेवल्यानंतर रोज किंवा एक दिवसाआड हलवावी.
१०. साधारणत: एका आठवड्याने उन्हामुळे साखरेचा पाक होईल व त्यात गुलाबाच्या पाकळ्या मुरून गुलकंद तयार होईल.
गुलकंदाचे खाद्य पदार्थ-
गुलकंद बर्फी
साहित्य- एक किलो खवा, पाव किलो गुलकंद, अर्धी वाटी साखर.
कृती-
१. कढईमध्ये तीन ते चार मिनिटे खवा परतवून घ्या. २. नंतर त्यात साखर व गुलकंद टाकून परत ५ मिनिट परतवून घ्या.
३. एका ताटात किंवा परातीमध्ये आतल्या बाजूने साजूक तूप लावून हे मिश्रण थापून घ्या.
४. नंतर त्याच्या वड्या पाडा.
गुलकंदाचे मोदक
साहित्य-
१/२ वाटी गुलकंद, ३/४ वाटी खोबऱ्याचा किस, ४-५ थेंब रोझ इसेंस, १ चमचा बारीक साखर, लाल खाद्य रंग चिमूटभर, चेरी आवश्यकतेनुसार.
कृती-
१. स्टीलच्या पातेल्यात गुलकंद घ्या.
२. नंतर त्यात खोबऱ्याचा किस व बारीक साखर टाका.
३. हे सर्व मिश्रण एकजीव करा.
४. नंतर त्यात लाल रंग टाका म्हणजे मोदक आकर्षक लालसर रंगाचे होतील.
५. रंग टाकल्यावर मिश्रणात चवीसाठी चेरी टाकावी.
६. तयार झालेले सर्व मिश्रण हे सर्व मिश्रण मोदकाच्या साच्यात भरून त्यांना मोदकाचा आकार द्यावा.
७. अशाप्रकारे गुलकंदापासून झटपट मोदक तयार होतील.
गुलकंद श्रीखंड
साहित्य- १ वाटी चक्का, पिठीसाखर दोन चमचे गुलकंद, वेलची पूड, काजू -बदामची पूड व बेदाणे.
कृती-
१. चक्का व साखर एकत्र करून चांगले फेटून घेऊन बारिक चाळणीतून गाळून घ्यावे.
२. मिश्रण एकजीव होईल याची काळजी घ्यावी.
३. या मिश्रणामध्ये गुलकंद, वेलची पूड, काजू-बदामची पूड व बेदाणे घालून एकत्र करावे.
४. रेफ्रीजिरेटर मध्ये ठंड करावे.
विविध पोषक तत्वांनी परिपूर्ण असणारे गुलकंद आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतो.