दिवस काळ्या आईचा !
आपल्या दैनंदित जीवनात मृदा ही अतिशय महत्वाची असून मृदा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे.माती ही आपली सीमित असलेली नैसर्गिक संपत्ती आहे. मृदेचा म्हणजेच मातीचा प्रामुख्याने उपयोग शेतीसाठी केला जातो. मातीचा १ इंच सुपीक थर निर्माण होण्यासाठी ८०० ते १००० वर्षे लागतात. खडक माती निर्मितीसाठीचा महत्वाचा घटक आहे. खडकाचे विदारण होऊन त्याचा भुगा तयार होऊन त्यामध्ये वनस्पतीची मुळे , पालापाचोळा, तसेच गांढूळ, गोम, मुंग्या यांसारखे जीव अश्या अनेक गोष्टी एकत्रित होऊन माती तयार होते. काळी , गाळाची, तांबडी, वन असे मृदेचे काही प्रकार आहेत.
माती हे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करत नसून मृदा प्रदूषण हे मानव करतो. वाढती लोकसंख्या पाहता अन्नधान्य लागवडीचे प्रमाण वाढले असून अधिक उत्पादन मिळावे यासाठी जमिनीवर विविध प्रयोग केले जातात.हरितक्रांती नंतर रासायनिक खतांचा वापर वाढत गेला त्यामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले. जगात माती बद्दलची जागरूव्हावी यासाठी २०१३ च्या संयुक्त राष्ट्राच्या ६८ व्या महासभेत मृदा दिवस साजरा करण्याचे ठरवले.
मातीचे स्वास्थ चांगले राहावेत यासाठी शेतकऱ्यांनी दर ३ वर्षांनी मृदा परीक्षण करणे गरजेचे आहे. मृदा परीक्षण म्हणजे काय तर, जमिनीतील नत्र , स्फुरद, पालाश यांचे प्रमाण तपासले जाते. मृदा परीक्षण केल्याने मातीमध्ये कोणते पीक घ्यावे, खतांचे प्रमाण किती असावे, रासायनिक गुणधर्मांची काय स्थिती आहे, प्रमुख अन्नद्रव्याची स्थिती याची माहिती मिळते. रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची सुपीकता कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य होईल तेवढा सेंद्रिय, नैसर्गिक खतांचा वापर केल्यास मातीची गुणवत्ता टिकून राहते. अन्नधान्य, फळे, फुले, भाजीपाला यांची गुणवत्ता मातीच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे.
मृदेवर संपूर्ण सजीव संरक्षण अवलंबून आहे त्यामुळे मृदेची काळजी घेणे ही काळाची गरज झाली आहे. पुढील काही गोष्टीं करून आपण मृदेचे संरक्षण करू शकतो.
१. झाडांमुळे मृदांचे कण धरून राहून वाहत्या पाण्यापासून मृदेचे संरक्षण होते. त्यामुळे शक्य होईल तेवढे वृक्षरोपण केले पाहिजे.
२. प्लास्टिक चा वापर शक्य होईल तेवढा टाळावा.
३. खराब , अशुद्ध पाणी जमिनीवर सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करावी.
शेतकऱ्यांसाठी टीप –
१. पिकांची लागवड आलटूनपालटून केल्यास जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.
२. कोणतेही पीक लागवड करण्यापूर्वी मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे.