डिसेंबर महिन्यात घ्या पिकाची काळजी !
डिसेंबर महिन्यात हरभरा,गहू ही प्रमुख पिके घेतली जातात. यांच्याबरोबर ज्वारी,कापूस,ऊस,लिंबूवर्गीय पिके घेतली जातात. डिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढलेले असते. थंड वातावरणात रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. अश्यावेळेस पिकाची काळजी घेणे गरजेचे ठरते. थंड वातावरणात पिकाची काळजी कशी घ्यावी याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
१. कपाशी वेचताना त्यामध्ये काडीकचरा, कागदाचे तुकडे,केस आदी येणार नाही याची काळजी घ्यावीत.
२. सुधारित कपाशीच्या पहिल्या व दुसऱ्या वेचणीतील कापूस नीट वाळवून कोरड्या जागेत साठवून ठेवावा.
३. कपाशी ओलसर असल्यास किमान २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात वाळवावेत.
४. गव्हाच्या पिकावर करपा व तांबेऱ्याची लागण दिसताच वेळीच बुरशीनाशकाची फवारणी करावीत.
५. बागायती गव्हाची ओलिताची पाणी मर्यादित असेल तर उगवणीपासून २१, ४२, ६५ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजे.
६. हरभरा व तूर पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसल्यास मोठया अळ्या वेचून काढून जमिनीत १ फूट खोल खड्डा करून त्यात गाडून टाकाव्यात.
७. करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसल्यास डायमिथोएट पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावीत.
८. मृग बहाराच्या संत्रा झाडांना नियमित ओलीत करावेत.
९. पांढरी माशी व मावाग्रस्त उसाची पाने गोळा करून जाळून टाकावीत.
वरील सांगितल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात पिकाच्या उत्तम वाढीसाठी, जास्त उत्पादनासाठी पिकाची काळजी घेणे आवश्यक आहे.