गवार पिकाची लागवड पद्धत
ग्रामीण भागातील लोकप्रिय अश्या असणाऱ्या गवार पिकाची माहिती आज आपण घेणार आहोत.कोवळ्या गवारचा उपयोग आपण भाजी म्हणून तर गवारीच्या सुकलेल्या बियांचा उपयोग आपण उसळ म्हणून करतो. महाराष्ट्रामध्ये अंदाजे ८९१० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. उत्तरप्रदेश , राजस्थान , गुजरात येथे गवार हिरवळीचे खत तसेच हिरवा चारा म्हणून वापरले जाते. गवारीच्या पिकापासून निघणाऱ्या डिंकाला परदेशात भरपूर संख्येने मागणी आहे. गवार मध्ये अ , ब , क जीवनसत्वे आणि चुना , लोह, फॉस्परस आदी खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
जमीन व हवामान –
१. गवार हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये घेतले जाते.
२. उत्तम पाण्याचा निचरा करणारी मध्यम ते भारी जमिनीत गवारीच्या पिकाचे उत्पादन चांगले होते.
३. जमिनीचा सामू ७.५ ते ८ यांच्या दरम्यान असावा.
४. गवार हे उष्ण हवामानातील पीक आहे.
५. गवारास १८ ते ३० अंश सेल्सिअस तापमान मानवते.
६. हिवाळी हंगाम या पिकासाठी मानवत नाही.
७. उष्ण व दमट हवामानात झाडांची वाढ चांगली होते.
बियाणे व लागवड अंतर –
१. हेक्टरी १४ ते २४ किलो बियाणे लागवडीस पुरेसे आहे.
२. पेरणीपूर्वी १० ते १५ किलो बियाण्यात २५० ग्रॅम रायझोबियम चिलावे.
३. दोन ओळींतील अंतर ४५ ते ६० सेंमी तर झाडातील अंतर २० ते ३० सेंमी ठेवावेत
खते व पाणी व्यवस्थापन –
१. गवार कोरडवाहू शेंगवर्गीय पीक आहे त्यामुळे या पिकास जास्त खतांची गरज भासत नाही.
२. लागवडीपूर्वी बागायती पिकास ६० किलो पालाश तर ५० किलो नत्र द्यावे.
३. गवार पिकास पाणी कमी लागते परंतु शेंगांचा बहार पूर्ण होई पर्यंत त्यास नियमित पाणी देणे गरजेचे आहे.
कीड व रोग –
१. भुरी हा बुरशीजन्य रोग गवार पिकावर दिसून येतो. ह्या रोगात पानांवर डाग पडतात त्यानंतर संपूर्ण पान पांढरे पडते.
२. भुरी हा रोग कालांतराने खोड आणि शेंगावर पसरतो.
३. गवारीचे झाड जर कोलमडून जात असेल तर त्यावर मर रोगाची लागण झाली आहे असे समजावे.
४. गवार पिकावर मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव होतो.
एकात्मिक कीड व रोग नियंत्रण –
१. भुरी या बुरशीजन्य रोगाच्या निवारणासाठी ५० % ताम्रयुक्त औषध, २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड १० लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा फवारावेत.
२. मर रोगाच्या निवारणासाठी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम थायरम चोळावेत. रोगट झाडाभोवती ताम्रयुक्त औषध ८ ते १० सेंमी बांगडी पद्धतीने खोल माती भिजेल असे ओतावेत.
३. मावा व तुडतुडे किडयांचा प्रादुर्भाव दिसल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसीक१.५ मिली किंवा मोनोक्रोटोफाँस ३६ डब्लूसी किंवा मिथिलडिमेटाँन २५ ईसी २ मिली प्रतिलिटरपाण्यात मिसळून फवारावे.
काढणी व उत्पादन –
१. हिरव्या , कोवळ्या परंतु पूर्ण वाढलेल्या शेंगांची नियमित तोडणी करावी.
२. शेंगा जास्त दिवस झाडावर राहिल्यास त्यांचे साल जाड होऊन त्यावरील रेषांचे प्रमाण वाढते.
३. हिरव्या शेंगाचे हेक्टरी १०० ते २०० क्विंटल उत्पादन मिळते.
गवार पिकाचे व्यवस्थापन व काढणी वेळोवेळी केली तर त्यापासून जास्त उत्पादन मिळू शकते.