फलोत्पादन

झेंडूच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न

Shares

झेंडू सगळीकडेच अतिशय महत्वाचे असणारे फुल पीक आहे झेंडूच्या फुलांचा उपयोग भारतामध्ये वेगवेगळ्या सणांना केला जातो. झेंडूचे पीक आपल्याकडे वर्षभर घेतले जाते. म्हणून झेंडूच्या फुलांना जास्त प्रमाणात मागणी असते. झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचा उपयोग हा काही रासायनिक घटक बनविण्यासाठी केला जातो. काही रसायनांचा उपयोग तर नैसर्गिक रंगद्रव्य म्हणून खाद्यपदार्थांना रंग देण्यासाठी आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा केला जातो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅन्सरवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधींमध्ये हे द्रव्य वापरले जातात.

झेंडूच्या पिकासाठी लागणारी जमीन व हवामान

झेंडूच्या पिकाची मागणी हिवाळ्यात जास्त असते. आफ्रिकन झेंडू प्रजातीची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात जर केली तर चांगल्या दर्जाची फुले मिळतात आणि उत्पन्नसुद्धा भरघोस निघते. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 15 दिवसांच्या अंतराने लागवड करावी. त्यासोबतच ऑक्टोबर ते एप्रिल या काळात भरपूर आणि दर्जेदार उत्पादन मिळते पण सर्वात जास्त उत्पादन सप्टेंबर मध्ये लागवड केल्यास मिळू शकते. झेंडूची लागवड ही योग्य प्रकारच्या जमिनीत करणे आवश्यक असते. झेंडू साठी सुपीक, पाणी घरून ठेवणारी, आणि पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणारी जमीन योग्य ठरते. झेंडू या पिकासाठी भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो.

झेंडू फुलांच्या काही प्रजाती :-

१) आफ्रिकन झेंडू :-

आफ्रिकन झेंडूचे झुडपे उंच वाढतात. पावसाळी हवामानात या झाडाची 100 ते 150 सें.मी. पर्यंत वाढ बघायला मिळते. याचा रंग पिवडा, फिकट पिवळा आणि नारंगी असतो.

२) फ्रेंच झेंडू :-

याच्या फुलांचा आकार लहान आणि मध्यम असून यामध्ये अनेक रंगाची फुले असतात. या प्रकारातील जाती कुंडीत, बागेत, रस्त्यांच्या दुतर्फा सुद्धा वाढतात. याच्या झुडपांची उंची 30 ते 40 सें.मी. असते.

झेंडूच्या काही संकरित जाती :-

पुसा नारंगी :-

पुसा नारंगी या जातीची लागवड केल्यानंतर 123 ते 136 दिवसानंतर पुसानारंगी या जातीच्या झाडांना फुले येतात. यांची 73 सें.मी. एवढी वाढ होते. याची फुले नारंगी रंगाची आणि 7 ते 8 सें.मी. व्यासाची असतात. याचे हेक्टरी उत्पादन 35 टन एवढे निघते.

पुसा बसंती :-

या जातीला 135 ते 145 दिवसात फुले येतात. झुडूप 59 सें.मी. पर्यंत चांगले वाढते. याची फुले पिवळ्या रंगाची असून 6 ते 9 सें.मी. व्यासाची असतात. कुंड्यांमध्ये लागवड करण्यासाठी ही जात जास्त योग्य ठरते.

एम. डी. यु. :-
या जातीची झुडपे मध्यम आकारची असतात. याची उंची 65 सें.मी. पर्यंत वाढते. प्रति हेक्टेर 41 ते 45 मेट्रिक टन एवढे उत्पादन यातून मिळते. फुलांचा रंग नारंगी असून याची फुले 7 सें. मी. व्यासाची असतात.

लागवडी पूर्वीची तयारी :-

झेंडूची लागवड करायची झाल्यास आपल्याला पूर्वमशागत करणे गरजेचे असते. मशागत करताना चांगले नियोजन करायला पाहिजे. म्हणजे आपण ज्या क्षेत्रफळा मध्ये लागवड करत आहोत त्या क्षेत्रफळामध्ये आडवी आणि उभी नांगरणी करून घ्यावी. जमिनीतील काडीकचरा वेचून बाहेर टाकावा. शेतामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रिय खताचा वापर करावा. शेणखत हे नागरटीपूर्वीच शेतामध्ये मिसळून द्यावे आणि संपूर्ण शेतातील मातीची ढेकळे फोडून घ्यावीत. शेतामध्ये ठिबकच्या साह्याने किंवा सरी च्या साह्याने आपण लागवड करू शकतो ज्यामुळे खर्च कमी येतो.

खत व्यवस्थापन :-

झेंडूची लागवड करताना ६० सें.मी. अंतर ठेऊन करावी. सरीच्या मध्यभागी 30 सें.मी. इतके दोन रोपांमधील अंतर ठेवून लागवड करावी. 60 × 30 सें.मी. इतक्या अंतरावर लागवड केल्यास जवळपास ४०,००० रोपांची लागवड करता येते. पीकाला भरपूर पाणी द्यावे. लागवड करताना संध्याकाळी करावी म्हणजे रोपांवर वाईट परिणाम होत नाही. झेंडूची लागवड करताना आपण शेणखत वापरणे गरजेचे असते, कारण शेणखतामुळे झेंडूच्या मुळांची वाढ पूर्णपणे होते आणि जमीन भुसभुशीत राहते त्यासोबतच झाडांना पाणी शोषून घेण्यास मदत होते. आफ्रिकन आणि फ्रेंच जातीसाठी खत २५ ते ३० मेट्रिक टन प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावे, तसेच १०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश याप्रमाणे खते घ्यावी. संकरित जातीची लागवड करायची असल्यास प्रति हेक्टरी नत्र २५० किलो, स्फुरद ४०० किलो याप्रमाणे लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून घ्यावी.

आंतर मशागत :-

झेंडू पिकाची लागवड केलेली असल्यास लागवडीनंतर 15 दिवसांनी पहिली खुरपणी करून घ्यावी. दुसरी खुरपणी ही 25 ते 30 दिवसांनी करून घ्यावी. नंतर 30 ते 35 दिवसांनी हेक्टरी 50 किलो नत्राचा डोस द्यावा. खुरपणी केल्यानंतर जमीन भुसभुशीत राहते त्यामुळे आपण नत्राचा डोस दिल्यामुळे तो पूर्णपणे झाडाला शोषून घेण्यास मदत होते. झेंडूची लागवड केलेले क्षेत्र हे तणरहित ठेवणे गरजेचे असते. पिकामध्ये तण जर जास्त प्रमाणात होऊ दिले तर झेंडूचे झाड हे रोगी होऊन त्याची वाढ कमी होते आणि झाड पिवळे पडून झाडाला लागलेल्या कळ्या बारीक राहतात. कळ्या बारीक राहिल्या तर फुले लहान होतात त्यामुळे आपल्या उत्पन्नात घट होते. झेंडूच्या लागवडीत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. झाड कळीधारणेवर आल्यानंतर किंवा फुल भरण्याच्या वेळेस त्या झाडाला पाणी देणे गरजेचे असते. झेंडूच्या मुख्य लागवडीसोबतच आपण झेंडूची आंतरपीक म्हणून सुद्धा लागवड करू शकतो. झेंडूच्या पीकाची आंतरपीक म्हणून लागवड ही कपाशी, सोयाबीन, तूर किंवा भाजीपाल्याच्या लागवडीबरोबर केली तर किडींपासून बाकीच्या पिकांचा बचाव होतो. अशाप्रकारे आपण झेंडूची लागवड योग्यप्रकारे केली तर या झेंडूच्या लागवडीतून एकरी सुमारे दोन ते अडीच लाखापर्यंत सुद्धा उत्पन्न तयार होते. म्हणून कोणत्याही काळात येणाऱ्या आणि बाजारपेठांमध्ये मागणी असणाऱ्या झेंडूची लागवड करणे कधीही फायदेशीर ठरते

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *