५० वर्ष पैसा देणारी बांबूची शेती !
शेती उद्योगामध्ये दीर्घकालीन चालणारे आणि फायदा मिळवून देणारे पीक म्हणजे बांबू लागवड. आज आपण याच बांबू लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत. बांबूच्या शेतीमध्ये भारताचा चीन या देशानंतर दुसरा नंबर लागतो. पण मागच्या काही वर्षांच्या निरीक्षणातून हे समोर आले आहे की, शेतकऱ्यांचा बांबूची शेती करायला फारसा कल दिसत नाही. म्हणूनच भारत सरकारने “राष्ट्रीय बांस मिशन योजने” अंतर्गत बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले आहे. ह्या योजनेअंतर्गत भारत सरकार शेतकऱ्यांना बांबू शेतीसाठी 50000 रु. सबसिडी देते. त्याचप्रमाणे छोट्या शेतकऱ्यांना एका बांबूच्या झाडामागे 120 रु. देण्याचे नियोजन ह्या योजनेत करण्यात आले आहे.
कोरडवाहू जमिनीत पण केली जाऊ शकते बांबूची शेती :–
भारतात बऱ्याच राज्यात शेतकरी कोरड जमीन किंवा कमी मौसमी पावसामुळे चिंतीत असतात आणि अशा शेतकऱ्यांसाठी बांबू शेती ही वरदान ठरू शकते. तज्ञांच्या मते बांबू शेतीसाठी कुठल्याही प्रकारची बागायती, सुपीक जमिनीची आवश्यकता नसते. याची शेती कोणत्याही जमिनीत केली जाऊ शकते. “नॅशनल बांबू मिशन”च्या अनुसार भारतामध्ये सध्या 136 प्रकारच्या बांबूच्या जातींची शेती केली जाते आहे. यात 125 स्वदेशी जाती आणि 11 विदेशी जाती आहेत. भारत सरकारच्या कृषी विभागाच्या वेबसाईटनुसार भारत दरवर्षी 13.96 टन बांबूचे उत्पादन करत आहे.
नॅशनल बांबू मिशनची उद्दिष्ट्ये :-
- शेतीच्या उत्पन्नाला जोड म्हणून बांबू लागवड त्यासोबतच जमीन, हवामान आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे.
- ज्या ठिकाणी वने नाहीत अशा शासकीय आणि खाजगी जागांमध्ये बांबूची लागवड करणे.
- उद्योगासाठी बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणे
- सामुदायिक जमीन,शेतीयोग्य कोरडी जमीन आणि नदी-नाल्यांजवळ बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे.
- विशेषतः शेतकऱ्यांच्या शेतात आणि घराजवळ बांबूच्या लागवडीला प्रोत्साहन देणे.
सुमारे 50 वर्षांपर्यंत पैसा मिळवून देणारा बांबू :-
साधारणपणे बांबूची शेती ही ३-४ वर्षांमध्ये तयार होते. महत्वाची गोष्ट अशी की, जर आपण बांबूच्या झाडाची लागवड 2.5 मीटरच्या अंतरावर केली असेल तर आपण मधल्या मोकळ्या जागेत जनावरांसाठी चारा उगवु शकतो. यासोबतच आपण शेताच्या बांधावर सुद्धा बांबूची लागवड करू शकतो. बांबूची लागवड एकदा केल्यावर 40-50 वर्ष एवढा दीर्घकाळ बांबू फायदा देऊन जातो. प्रत्येक कापणीनंतर बांबूचे झाड नव्याने वाढायला सुरवात होते आणि बांबू शेतीतून दरवर्षी हेक्टरी 3-4 लाखांचे उत्पन्न सुद्धा आरामात मिळते.
येत्या काळात वाढणार बांबूची बाजारपेठ :-
सरकारचे ह्या बांबू क्षेत्रासाठी ज्याप्रमाणे काम करणे चालू आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदाच होणार आहे. देशाच्या पहाडी क्षेत्रात बांबूचा वापर घर बांधणीसाठी केला जातो. ह्यासोबतच बांबूचा वापर फर्निचर, कापड, हर्बल औषध, हॉटेल्स इत्यादी क्षेत्रात केला जातो. अनेक सजावटीचे सामान, घर-सामान असे अनेक प्रॉडक्ट बनवण्यासाठी बांबूला प्राधान्य देण्यात येते.
प्लास्टिकचा वापर कमी करून बांबू वापरावर भर देण्याच्या उद्देशाने भारत सरकारचे प्रयत्न चालू आहे. येणाऱ्या काळात अजूनही ह्याचा बाजार मोठा होईल ह्यात काही शंकाच नाही. बांबूवर आधारित रोजगार निर्माण करण्याला प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे. सरकारच्या ह्या उद्दिष्टामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था परत बहरून जावी यासाठी काम करणं सुरु आहे. बांबू लागवडीसाठी असलेल्या गोष्टींचा फायदा घेत शेतकरी आता समृद्ध होत आहेत. व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क