बटाटाचे उत्पन्न वाढवायचं मग या पद्धतीने करा लागवड … !
बटाटा म्हणजे सर्वसामान्यांच्या आहारातील नेहमीचाच भाग. बटाट्याचे विविध रुचकर खाद्यपदार्थ, वेफर्स सारख्या गोष्टी तयार होत असल्याने बाजारात याची मागणी नेहमीच असते. आज जाणून घेऊयात नक्की काय केल्यावर बटाट्याच्या उत्पादनात वाढ होईल.
बटाटा पीकाला लागवड करण्याआधी हेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो पालाश द्यावे आणि लागवड झाल्यावर सुमारे १ महिन्याने, ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची मुळे जमिनीत वरच्या थरात वाढतात. त्यामुळे या पीकाला कमी पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. जमिनीच्या जवळ असणाऱ्या फांद्या वाढू लागतात आणि त्यांची टोके फुगीर होतात, त्या वेळेस ६ ते ८ दिवसांच्याअंतराने पाणी द्यावे. पिकाची वाढ पूर्ण झाल्यावर पाण्याच्या पाळ्या कमी कराव्या.
रोग :-
करपा :- यामध्ये पानावर काळे ठिपके पडून पानगळ होते. बटाट्यावर खोलगट चट्टे पडू लागतात. यावर उपाय म्हणून डायथेन एम ३० ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मर :- या रोगात मोठी झाडे पिवळी होतात आणि ढिली पडतात. बुंध्याजवळ जमिनीजवळच्या भागावर बुरशी येते. या पासून बचाव करण्यासाठी पीकांची फेरपालट आणि नियमित पाणी देऊन या रोगावर नियंत्रण करता येते. यासोबतच जमिनीत नँप्थलीन किंवा फॉरमँलिन मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते.
खोक्या :- हा असा रोग आहे की ज्यात रोगाचा प्रसार जमिनीतून होतो. जमिनीचे तापमान ३२ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले तर ते रोगाला पोषक ठरते.
जमिनीचे तापमान ३२ डिग्री सेल्सिअसच्या वर चढण्यापूर्वी बटाट्याचीकाढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी ठेवावे.
देठ कुरतडणारी अळी :- ह्या अळ्या रात्रीच्या वेळी खोडाजवळील भाग कुरतडतात. पाने आणि कोवळे देठ खाऊन टाकतात. या अळ्यांच्या बंदोबस्तासाठी क्लोरेड एम ५% पावडर, हेक्टरी ५० किलो जमिनीवर सायंकाळी धुराळावी.
मावा आणि तुडतुडे :- या मध्ये कीडे पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात. लागवडीनंतर १५ दिवसांनी मिथिल डिमेटाँन १० मिली, १० लिटर पाण्यात मिसळून किंवा फाँस्फोमिडाँन ८५ डब्लू एमसी १० मिलि, १० लिटर पाण्यात फवारावे.
बटाट्यावरील पतंग :- ही किड बटाट्याचे प्रचंड नुकसान करते. या मध्ये साठवणुकीच्या काळात नुकसान होते. आळया बटाट्यात जाऊन आतला भाग पोखरू लागतात. यावर उपाय म्हणजे कार्बारील ५० डब्लू.पी.ची पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अशाप्रकारची सर्व काळजी घेतल्यावर आपण, नेहमीच चांगलीच मागणी असलेल्या बटाट्याची लागवड करून उत्पादन वाढवू शकतो.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क