टमाटरची जुगाडू शेती जी बनवेल मालामाल….
संपूर्ण माहिती
टमाट्याचे पीक उष्ण हवामानातील पीक आहे. महाराष्ट्रात तीनही हंगामात हे पीक घेतले जाते. जास्त थंडीमुळे टमाट्याच्या झाडांची वाढ होत नाही. हवामानातील सारख्या सारख्या बदलामुळे पिकावर बुरशी, कीड, कोकडा पडणे, झाडांची वाढ खुंटते अशा बऱ्याच अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. खरंतर 13 ते 38 डिग्री सेल्सियस वातावरणात झाडाची वाढ चांगली होते आणि फळे व फुले चांगले लागतात. तापमान, सूर्यप्रकाश आणि आद्रता या सगळ्यांचा परिणाम पिकांच्या वाढीवर होतो. टमाट्याच्या भरमसाठ उत्पन्नासाठी मुरमाड आणि काळी जमीन चांगली असते. मुरमाड जमिनीत फळे लवकर तयार होतात आणि पाण्याचा निचरा लवकर होतो. पण हलक्या जमिनीसाठी सेंद्रिय खताचा मारा जास्त करावा लागतो आणि दोन-तीन दिवस आड पाण्याची सोय करावी लागते यात जमिनीचा पोत मध्यम स्वरूपाचा असायला पाहिजे पीक लागवडीच्या शेतात उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून वखरणी करून घ्यावी. जमिनीत दोन ते अडीच एकरात 30 ते 40 गाड्या शेणखत मिसळून लागवडीसाठी दोन्ही सरीमधील अंतर 60 ते 90 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि दोन रोपांमधील अंतर 45 ते 60 सेंटिमीटर असला पाहिजे खरीप म्हणजेच हिवाळी मोसमात 90 बाय 60 सेंटिमीटर अंतरावर व उन्हाळी म्हणजेच रब्बी मोसमातील 60 बाय 45 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी.
कुठल्या हंगामात लागवड योग्य :-
खरीप :- खरीप हंगामातील पिकाची रोपे जून-जुलै महिन्यात लावावीत.
रब्बी :- रब्बी हंगामातील पिकाची रोपे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात लावावीत.
बियांच्या संख्येचे प्रमाण :- अडीच एकरात म्हणजेच हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम बी लागवड करावी
लागवडीसाठी वाणांचे प्रकार :-
1) पुसा रुबी :-
पुसा रुबी हे वाण तीनही हंगामात घेता येणारे वाण आहे, हे वाण लागवड केल्यापासून 45 ते 90 दिवसांनी फळ काढणीला येते. फळे मध्यम आकाराची लालबुंद रंगाची असतात अडीच एकरात म्हणजेच हेक्टरी ३५० क्विंटल एवढे उत्पन्न होते.
२) पुसा गौरव :–
ही जात छोट्या-छोट्या झुडपांसारखी वाढणारी आहे. या वाणाची फळे लांबट गोल आणि पिकल्यावर पिवळसर लाल रंगाची होतात. यात हेक्टरी चारशे क्विंटल उत्पन्न होते.
३) पुसा शीतल :-
पुसा शीतल हे वाण हिवाळ्यात लागवडीसाठी चांगले असते त्याची फळे चपटी गोल लाल रंगाची असतात. उसा शितल या वाणाचे उत्पन्न अडीच एकरात म्हणजेच हेक्टरी 350 क्विंटल होते.
४) अर्क गौरव :-
अर्क गौरव या वानाचे फळ गडद लाल आणि गर युक्त टिकाऊ असते. अर्क गौरव या वाणाचे उत्पन्न हेक्टरी 350 क्विंटल होते.
मशागत :–
रोप तयार करण्यासाठी जमीन नरम व भुसभुशीत करून वाफ्यांमध्ये बियांची पेरणी करावी. वाफे तयार करण्याच्या अगोदर जमिनीची दोन ते तीन वेळा खोलवर नांगरणी करून जमीन भुसभुशीत करावी. एक मीटर रुंद, तीन मीटर लांब व 15 सेंटिमीटर उंच याप्रमाणे वाफ्याची आखणी करावी. वाफ्यात एक घमेले शेणखत, 50 ग्रॅम सुफला मिसळून वाफ्याची चांगली मशागत करून घ्यावी. हाताने वा्फा सामान करून घ्यावा. पेरणी अगोदर बियाण्यास तीन ग्रॅम थायमस बुरशीनाशक औषध चोळावे. बियांची पेरणी वाफ्याच्या रुंद बाजूच्या समांतर बाजूस बोटाने समांतर रेषा ओढून त्यामध्ये पेरणी करावी. आणि बी मातीने झाकून नंतर बी पेरलेल्या वाफ्यात झरिने किंवा हलक्या फवाऱ्याने पाणी सोडावे.
बी उगवून आल्यावर दहा ते बारा दिवसांनी दोन बारीक बारीक बांध टाकून वाफे तयार करावे व प्रति वाफ्यात दहा ग्रॅम पोटॅश द्यावे. वाफ्यात गवत होऊ नये याची काळजी घ्यावी. फुलकिडे आणि करपा रोगा पासून वाचण्यासाठी दहा लिटर पाण्यात बारा ते पंधरा मिली मोनोक्रोटोफास आणि 25 ग्रॅम डायथेन एम 45 मिसळून बी उगवल्यानंतर फवारणी करावी नंतरच्या दोन फवारण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्या. पेरणीपासून 25 ते 30 दिवसांनी म्हणजे 12 ते 15 सेंटिमीटर एवढी उंची झाल्यावर रोपाची सरी पद्धतीने लागवड करावी. रोपाची लागवड कधीही संध्याकाळी किंवा सकाळी ऊन कमी असतांना करावी. रोपाची लागवड झाल्यावर तीन ते चार दिवसांनी कमी दाबाने म्हणजेच हलके पाणी द्यावे. पहिले पाणी दिल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. पावसाळ्यात जमिनीचा पोत पाहून किमान आठ ते दहा दिवसांनी पाणी द्यावे आणि हिवाळ्यात पाच ते सात दिवसांनी पाणी द्यावे तसेच उन्हाळ्यात तीन ते चार दिवसांनी पाणी द्यावे. काळ्या म्हणजेच जाड जमिनीला कधीही हलक्या प्रमाणात पाणी द्यावे.
पिक फुल आणि फळांच्या बहरात असताना आणि फळांची वाढ होताना सारखे सारखे पाणी देणे गरजेचे असते. उन्हाळ्यात टमाट्याला दांडा ने पाणी दिल्यास 77 हेक्टर सेमी पाणी लागते. आणि जर ठिबकने पाणी दिल्यास 56 हेक्टर सेमी पाणी लागते. ठिबक सिंचनामुळे 50 ते 55 टक्के पाण्याची बचत होते आणि उत्पन्नात 40 टक्के फरक होतो. वेळोवेळी खुरपणी करून गवत काढून टाकावे. खुरपणी करताना पिकाचे मूळ तुटणार नाही हे पाहून खुरपणी करावी. टमाट्याचे झाड, मूळ, फांद्या या कमकुवत असल्यामुळे लवकर तुटतात. म्हणून त्यांना आधारासाठी टेकू द्यावा लागतो. टेकू दिल्यामुळे झाडाची व फांद्यांची वाढ चांगली होते. आधार म्हणून फांद्यांना दोरीने टेकु च्या मदतीने वर बांधून द्यावे त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते. टेकु मुळे फांद्यांचा आणि फळांचा मातीशी संबंध येत नाही व त्यामुळे फांद्या, पान-फळे सोडत नाही. टेकु मुळे फवारणी करणे आणि खत देणे सोपे जाते.
टमाट्याच्या झाडांना दोन प्रकारे आधार देतात :-
1) प्रत्येक झाडाजवळ दीड-दोन मीटर लांबीची आणि अडीच सेंटीमीटर जाडीची काडी उभी करून झाडाच्या वाडी प्रमाणे झाडाला बांधले जाते.
2) दुसरे म्हणजे तार आणि बांबू. काठ्या आणि दोरीच्या साह्याने ताट्या तयार केल्या जातात.
रोग व कीड :-
करपा :- करपा हा रोग झाड लहान असल्यापासून ते मोठे होईपर्यंत कधीही येऊ शकतॊ या रोगामुळे झाडाच्या पाने खोड डेट यावर तपकिरी गुलाबी ठिपके पडतात.
भुरी :- पानाच्या खालच्या बाजूस बारीक जाळी सारखे पांढरे पट्टे पडतात
उपाययोजना :- डायथेम एम 45, १० लिटर पाण्यात 25 ते 30 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. दर १०-१५ दिवसांनी फवारणी करावी.
अशाप्रकारे रोजच्या आहाराचा भाग असणाऱ्या टमाट्याची योग्य अशी लागवड आणि व्यवस्थापन करू शकतो ज्याने उत्पन्न जास्त घेता येते.
व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क