बोर लागवड करायचीय किती उत्पन्न मिळेल संपूर्ण माहिती …

Shares

आधुनिक शेती पद्धती वापरात आपला फायदा करून घेण्यासाठी सध्या फळबागांवर सुद्धा नवीन प्रयोग केले जात आहेत. वेगवेगळ्या लावल्या जाणाऱ्या फळबाग पीकांपैकी वेगळेपणा असणारे फळपीक म्हणजे बोर. वेगवेगळे जीवनसत्व असणाऱ्या बोराची बाजारपेठेत वाढती मागणी आहे.


भारतामध्ये वेगवेगळ्या मोठ्या राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते. महाराष्ट्रामध्ये विशेष करून अहमदनगर, धुळे, बुलढाणा, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बोरासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी आणि क्षारयुक्त, आम्लयुक्त व खडकाळ जमीन योग्य ठरते. उष्ण वातावरणामध्ये हे पीक चांगल्याप्रकारे येते. भारतामध्ये विशेषतः गोला, उमराण, बनारसी या जातींचा लागवडीसाठी वापर केला जातो. महाराष्ट्रात उमराण व कडला या जातींचा जास्त वापर केला जातो. त्यासोबतच सध्याच्या काळात कलमी असलेल्या ॲपलबोर या जातीची लागवड बरेच जण करताना दिसत आहे. या जातींच्या बोरामध्ये गर जास्त व बियाचा आकार हा छोटा असतो. चवीला गोड असणाऱ्या या बोरांची मागणी बाजारात वाढत आहे.
बोरांची लागवड साधारणपणे मान्सूनच्या सुरुवातीला केली जाते. कमी पाऊस असणाऱ्या ठिकाणी बोराची लागवड 6 मीटरवर आणि जास्त पावसाच्या ठिकाणी बोराची लागवड 8 मीटर अंतरावर केली जाते. लागवड करतांना 60 x 60 x 60 आकाराचे खड्डे करून ते शेणखताने भरुन घ्यावे, त्यात 50 ग्रॅम हेप्लाक्लोर पावडर मिसळावी. लागवडीनंतर 3-4 आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे. बोराला फुलधारणा झाल्यानंतर जवळपास 150-175 दिवसांनी फळ काढणीला येतात. मागच्या काही वर्षांमध्ये उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने बोरांना चांगला भाव मिळाला. पण जर बोराची लागवड वाढून उत्पादन वाढू लागले आणि तुलनेने मागणी तेवढीच राहिली तर किंमत काही प्रमाणात कमी होऊ शकते यामुळे अलिकडच्या काळात बोर प्रक्रिया उद्योग चालु होत आहेत. ज्यांमध्ये भरपूर फायदा होतो.


बोरांवर प्रक्रिया केलेले काही उत्पादने पुढीलप्रमाणे :


बोर लोणचे :- बोरापासून बनविलेले लोणचे बाजारामध्ये उपलब्ध आहे. हे बनविण्यासाठी पुर्ण पक्के होत आलेल्या पण हिरवट रंगाच्या बोराची निवड करतात.
बोरांची चटणी :- बोरामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे बरेच गुणधर्म असल्यामुळे बोरापासून चटणी बनविली जाते. ह्यात किंचीत पिवळसर बोरांची निवड करतात.
बोराची पावडर :- बोराची पावडर तयार करुन ती साठवता येऊ शकते. बोरांची उपलब्धता नसताना किंवा बोरे जास्त काळ हवे आहेत पण खराब होऊ शकतील अश्या वेळी या पावडराचा उपयोग आहारामध्ये करतात.
बोराची टुटीफ्रुटी :- मोठ्या आकाराच्या बोरांपासून टुटी-फ्रुटी बनविली जाते. ज्याचा उपयोग फ्रुटब्रेड आणि श्रीखंडासारखे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो.
खजुर :- मोठ्या आकाराच्या बोरापासून अलिकडच्या काळात खजुर किंवा सुकामेवा बनवला जातो. यात मोठ्या आकाराच्या बोरांना स्वच्छ धुवून, छिद्रे पाडली जातात आणि गरम पाण्यातुन काढुन त्यावरती साखरेच्या पाकाची प्रक्रिया करतात.
अशाप्रकारे शुष्क, कोरड्या आणि साधारण प्रदेशात सुद्धा चांगली लागवड करता येणाऱ्या या बोराला बाजारात तर मागणी आहेच सोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केलेल्या उत्पादनांसाठी बोरांचा वापर वाढताना दिसत आहे. त्यामुळे कमी पाण्यात चांगले उत्पन्न देणारी बोर लागवड ही अतिशय उत्तम लागवड असल्याचे शेतकरी आनंदाने सांगतात.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *