आता खाद्यतेल होणार स्वस्त…!
आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात आभाळाला भिडणारे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर अशा परिस्थितीत काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
आयात केल्या जाणाऱ्या पाम तेल आणि विविध खाद्यतेलावरील आयात शुल्क ८,००० रुपये प्रति टन एवढी कपात सरकारकडून करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किंमती वाढल्याचा भारतीय बाजारपेठेवर बराच परिणाम होतो कारण भारताकडून सुमारे ७२ % खाद्यतेल आयात केले जाते. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क प्रती टनामागे ८६ डॉलर्सनी कमी करण्यात आले आहे.
मागील वर्षात भारतीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर जवळपास दुपटीने वाढल्यामुळे जनसामान्यांची चिंता वाढली होती. क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात सरकारने प्रती टन ३७ डॉलरची कपात केली असून, पाम तेलावरील आयात शुल्क प्रती टनामागे ११२ डॉलर्सने घट करण्यात आली आहे. केंद्र सरकारने तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करुन खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणले जातील, असे आश्वासन दिले होते.त्यानुसार आता खाद्य तेलाच्या किमतीत काही प्रमाणात घट होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क