सोयाबीनसारखी कापसाची गत होऊ नये म्हणजे झालं !
सोयाबीन दराला घेऊन अजूनही शेतकरी संभ्रमात आहेत. आता पर्यंत सोयाबीनच्या दरात वाढ होईल या आशेवर शेतकरी होता. परंतु सोयाबीनचे दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी घसरत आहेत. टप्याटप्याने करून सोयाबीनची आवक वाढत चालली आहे. असेच काही चित्र कापसाच्या बाबतीत दिसून येत आहे. कापूस जेव्हा विक्रीला आला होता तेव्हा कापसाचे दर ८ हजारांपेक्षा जास्त होते. परंतु सध्या कापूस उत्पादनात घट होत असून मागणी वाढत आहे. त्यामुळे कापसाचे भाव अधिक वाढतील असा अंदाज दर्शवला जात आहे. शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करण्यास सुरुवात केली असून मराठवाड्यातील कापूस खरेदी केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. जोपर्यंत कापसास अपेक्षित भाव मिळत नाही तोपर्यंत कापसाची विक्री न करण्याचा निश्चय शेतकऱ्यांनी केला आहे.
या वेळेस पावसामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती. कापूस क्षेत्र कमी होऊन सोयाबीनचे क्षेत्र वाढले होते. जागतिक पातळीवर कापसाची मागणी मात्र वाढत होती.त्यामुळे सुरवातीस कापसाला ८ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र शेतकऱ्यांना १० हजार दराची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरी कापूस साठवणुकीवर जास्त भर देत आहे. असेच काही सोयाबीनच्या बाबतीत घडले होते. सुरवातीला सोयाबीनला ४ हजार दर मिळत होता. शेतकऱ्यांनी साठवणूक करण्यास सुरुवात केल्यानंतर हा दर ६ हजारावर आला आता हा दर काही जागी स्थिर तर काही जागी घटत आहे. त्यामुळे आता सोयाबीनची आवक वाढत आहे. असे कापसाच्या बाबतीत होऊ नये अशी अपेक्षा करता शेतकरी करत आहे.