सोयाबीनच्या दरामध्ये बदल शेतकऱ्यांना मिळाला दिलासा ! लगेच जाणून घ्या नक्की काय झालाय बदल…?
बाजारपेठांमधील सर्व वातावरण पोषक असतानाही मागील आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण आणि स्थिर भाव अशा गोष्टी बघायला मिळत होत्या. आता आठवडाभराने का होईना पण सोयाबीनच्या दरात सुधारणा झालेली बघायला मिळत आहे. या दरांमध्ये जवळपास 300 रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
सोयापेंडच्या आयातीला स्थगिती असताना सुद्धा दरात वाढ होत नव्हती तर सातत्याने घसरण सुरु होती. आवक वाढत असताना सुद्धा दर कमी होत असल्याने काय करायला हवे अशा द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी होते. पण शुक्रवारी दरांमध्ये झालेली वाढ बघता काही प्रमाणात सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दोन सौद्यांमध्ये होणार सोयाबीनची विक्री –
सोयाबीन आणि बियाण्यांसाठी वापरले जाणारे सोयाबीन या दोन्हीची आवक लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरु झाली आहे. आगामी हंगामाची तयारी आतापासूनच सुरु झालेली आहे. बियाण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या सोयाबीनला 7 हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे तर नियमित असलेल्या सोयाबीनच्या दरात शुक्रवारी 300 रुपयांनी वाढ झाली आहे. आता येत्या सोमवारपासून नियमितपणे सोयाबीन आणि बियाणांसाठी वापरले जाणारे सोयाबीन यांचे वेगवेगळे सौदे होणार आहेत.
बाजारपेठेत सुरु झाल्या सकारात्मक हालचाली –
आता खरीप हंगामातील तुरसुद्धा बाजारात दाखल झाल्याने बाजारातील रेलचेल वाढली असून सोयाबीनच्या दरात आणखीन वाढ होऊ शकते अशी अपेक्षा शेतकरीवर्गात दिसत आहे.