शंभर वर्षे आयुष्य असणारी बांबू वनस्पती
भारत, श्रीलंका , म्यानमार या देशात जास्त संख्येने आढळते. भारतात गुजरात, महाराष्ट्र, केरळ , कर्नाटकच्या जंगलामध्ये बांबू वनस्पती नैसर्गिक पद्धतीने वाढते. गवा आणि हत्तीचे मुख्य खाद्य बांबूची पाने आहेत.बांबू वनस्पती शंभर वर्षांनंतर एकदाच फळे आणि फुले देते आणि नंतर सुकून जाते. ही गवत कुळातील वनस्पती आहे.बांबू समूहाने सरळसोट २० ते ३० मीटर पर्यंत उंच वाढते. त्यांना फांद्या नसतात. बांबूच्या दोन पेरामधील भाग पोकळ असतो.बांबू इमारती, कागद, टोपल्या , पत्रे आदी निर्मितीसाठी मोठ्या संख्येने वापरले जाते .बांबूच्या कोवळ्या खोडांच्या कोंबाची भाजी बनवतात . बांबूचे अनेक औषधी उपयोग आहेत. आपण जाणून घेऊयात बांबू लागवडी बद्दल संपूर्ण माहिती.
बांबूचे औषधी उपयोग –
१.बांबूच्या मुळाच्या सालीचा उपयोग पुरळ बरे होण्यासाठी करतात.
२. बांबूचे बी मधुमेहींच्या आहारास उपयुक्त ठरते.
३. गुरांना अतिसारात व काळीमिरी मिठाबरोबर देतात.
४. बांबूचे कोवळे कोंब सांधेसुजीत बांधतात.
५. बांबू कफ साठी देखील फायदेशीर ठरते.
६. बांबू तंतुमय वनस्पती असून त्यात मोठ्या संख्येने क्षार उपलब्ध असतात.
जमीन व हवामान –
१. पाण्याचा योग्य निचरा होणारी भुसभुशीत जमीन बांबू लागवडीसाठी योग्य ठरते.
२. पाणथळ , चिबड , क्षारपड जमिनीत बांबू पिकाची लागवड करू नये.
३. बांबू पिकास उष्ण व दमट हवामान मानवते. उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते.
लागवड –
१. बांबूची लागवड ३ x ३ मीटर ते ७ x ७ मीटर अंतरापर्यंत करावी.
२. जास्त अंतराने बांबूची लागवड करणे फायदेशीर ठरते. जास्त अंतर ठेवल्यास बांबूची वाढ चांगली होते आणि बांबू तोडणीच्या वेळेस अडचण येत नाही.
३. एक हेक्टरी अंतरावर जवळपास ४०० बांबूची रोपे बसतात.
४. पिशवीमधील रोपांची लागवड करतांना पिशवी फाडून मातीच्या गोळ्यासह रोप खड्यात बसवून आजूबाजूची माती चौफेर घट्ट दाबून घ्यावी .
५. एप्रिल – मे महिन्यात ५ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सेंटिमीटर आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत जेणेकरून उन्हाळ्यात माती तापून त्यामधील किडी मरण्यास मदत होईल.
कोणत्या कारणांमुळे बांबूची मर होऊ शकते –
१. वाहतुकीच्या वेळेस रोपांना इजा झाल्यास.
२. कंद काढतांना रोपांना इजा झाल्यास.
३. लागवडीच्या वेळेस रोपांच्या भोवती माती व्यवस्थित न दाबली गेली तर.
४. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास.
खुरपणी –
१. बांबू गवत प्रकारातील वनस्पती असल्याने त्यांची मुळे जमिनीच्या वरच्या थरातच असतात. त्यामुळे अन्न व पाणी मिळवण्यासाठी दोन्हीची स्पर्धा होते.
२. वेळोवेळी रोपाभोवतीचे तण काढणे आवश्यक आहे.
३. रोपाभोवतीची माती भुसभुशीत राहील याची काळजी घ्यावी.
४. बांबूची वाढ सर्व काळात होते त्यामुळे मातीतील ओलावा कायम राहील याची काळजी घ्यावी.
पाणी –
१. उन्हाळ्यात या पिकांना पाणी देण्याची गरज भासते.
२. हलक्या व मुरमाड जमिनीत एका आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे.
३. मध्यम व भारी जमिनीत १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
४. १ ते २ वर्षांनंतर बांबूस पाणी देण्याची आवश्यकता पडत नाही. तरीही पाणी देण्याची सोय असेल तर हलके हलके पाणी दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते .
आंतरपीक –
१. बांबू लागवडीनंतर जवळ जवळ ३ ते ४ वर्षांनी आंतरपीक घेण्यास हरकत नाही.
२. आंतरपीक घेतल्यास जमीन तण विरहित राहण्यास मदत होते.
काढणी –
१. लागवडी नंतर ४ ते ५ वर्षांनी पीक काढण्यास सुरुवात होते.
२. नवीन फुटीसाठी व रोगराई पासून संरक्षण व्हावे यासाठी बांबू दरवर्षी काढणे फायद्याचे ठरते.
३. बांबू तोडतांना पूर्ण जमिनीलगतपासून न तोडता दुसऱ्या व तिसऱ्या पेन्याच्या मध्यभागातून कुऱ्हाडीने घाव करून तोडावे.
४. बांबू योग्य ठिकाणापासून तोडल्यास कुजण्यापासून त्याचे संरक्षण होते.
५. एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात बांबूची काढणी करू नये. कारण त्या काळात बांबूची वाढ जलद गतीने होत असते.
उत्पादन –
१. रोपांच्या लागवड पद्धतीवर बांबूचे उत्पादन अवलंबून असते.
२. लागवडीच्या चौथ्या वर्षांपासून उत्पादन घेण्यास सुरुवात होते.
३. ५ x ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४,००० रोपे बसतात.
४. बांबूची लागवड केल्यांनतर सलग ४० वर्षे त्यापासून उत्पादन मिळते.
५. दरवर्षी बांबू उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढते.
६. लागवडीच्या सहाव्या वर्षांपासून २ इंच व्यासाचे व १८ फूट लांबीचे बांबू सहज मिळतात.
बांबूची लागवड केल्यांनतर ४० वर्षापर्यंत पाणी व खते देण्याशिवाय इतर कोणतीही मशागत करावी लागत नाही. शंभर वर्षापर्यंत बांबू पीक घेता येते. बांबू उत्पादनातून नफा देखील उत्तम होतो.