तांदळाच्या दरात वाढ ?
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी धानाचे उत्पादन कमी प्रमाणात आले आहे. यावर्षी विदर्भात सततच्या बदलत्या वातावरणामुळे धानाची पेरणी कमी प्रमाणात झाली आहे. त्याचबरोबर धान पिकांवर अनेक विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर येथे दरवर्षी मोठ्या संख्येने धानाचे पीक घेतले जाते. मात्र यावर्षी धानाच्या उत्पादनात चांगलीच घट झाली आहे. त्याचबरोबर तांदळाचे उत्पादन कमी झाले आहे. याचा परिणाम तांदळाच्या दरावर होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात धानाचे पीक मुख्य पीक म्हणून घेतले जाते. परंतु या वेळेस कमी पाऊस पडला असून पेरणीच्या वेळेसच पाऊस लांबणीवर गेला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पऱ्हे सुकले होते. याचा मोठा परिणाम तांदळाच्या उत्पादनावर झाला.
खताच्या दरात वाढ झाल्यामुळे तांदूळ पिकावर काही परिणाम झाला का ?
आधीच पिकाचे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करत होता. त्यात खतांचे दर वाढले. पूर्वी प्रति एकरी १८ हजार रुपये खर्च येत होता मात्र आता प्रति एकरी २६ हजार रुपये पर्यंत खर्च लागला आहे. त्यामुळे मागील वर्षी प्रति क्विंटल २,२०० रुपये दर होता तर यंदा प्रति क्विंटल २४५० रुपये दर आहे.
कमी पर्जन्यमानामुळे दर घसरले का ?
यावेळेस विदर्भात कमी पाऊस पडल्यामुळे धान भरला गेला नाही. याचा परिणाम तांदळाच्या दरावर होण्याची जास्त शक्यता आहे. तांदळाचे दर प्रति किलो ५ ते ७ रुपयांनी वाढण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक, आंध्रप्रदेशात तांदूळ पिकास जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे आपल्या राज्यातला शेतकरी धान विक्रीस काढत नाहीये. भाववाढीची दाट शक्यता दिसून येत अजून नवीन धानाची आतापासूनच मागणी सुरु झाली आहे.
तांदूळ दरात तेजी ?
यावेळेस उत्पादन कमी मात्र लागवड खर्च जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे तांदूळ दरात वाढ होतांना निदर्शनात येत आहे. बासमती तांदळात प्रति किलो प्रमाणे तब्बल १० ते १२ रुपयांनी वाढ झाली आहे. म्हणजेच दिल्ली, अमृतसर, रुद्रपूर येथून येणाऱ्या बासमती तांदळाची प्रति किलो प्रमाणे किंमत ९० ते १३० रुपये झाली आहे.