बाराही महिने या पिकाची लागवड करा, मिळवा लाखोंचे उत्पन्न
मुळा हा अनेक आजारांवरील उपाय आहे. आपण मुळा कच्चा देखील खाऊ शकतो. मुळा बरोबरच मुळ्यावरील हिरवा पाला याचा देखील वापर भाजी साठी केला जातो.
मुळ्याच्या हिरव्या पाल्याची आणि शेंगाची भाजी करतात, मुळ्याची कोशिंबीर करतात. मुळ्याच्या हिरव्या पानांमध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. मुळ्यामध्ये चुना, फॉस्फरस, पोटॅशियम ही खनिजे आणि काही प्रमाणात ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्वे असतात.
मुळा पिकाचे आयुर्वेदात महत्व आहे. मुळामध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. या पिकच्या लागवडीसाठी योग्य जमीन व हवामानाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
लागवड
- मुळ्याची व्यापारी लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात केली जाते. रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत बियांची पेरणी करावी.
- उन्हाळी हंगामासाठी मार्च-एप्रिल महिन्यात, तर खरीप हंगामासाठी जून ते ऑगस्ट महिन्यात बियांची पेरणी करावी.
- मुळ्याची लागवड करताना दोन ओळीतील अंतर ३० ते ४५ सें.मी. आणि २ रोपांमधील अंतर ८ ते १० सें. मी. ठेवावे.
- मुळ्याची लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी वरंब्यावर केली जाते.
- दोन वरंब्यामधील अंतर मुळ्याच्या जातीवर अवलंबून असते.
- युरोपीय जातीसाठी हे अंतर ३० से. मी. ठेवतात, तर आशियाई जातीकरिता ४५ सें. मी. इतर ठेवतात.
- वरंब्यावर ८ से.मी. अंतरावर २ ते ३ बिया टोकन करून पेरणी करतात.
- सपाट वाफ्यात १५ – १५ सें. मी. अंतरावर लागवड करतात. बियांची पेरणी २-३ से.मी. खोलीवर करावी.
- पेरणीपूर्वी जमिनीत ओलावा असावा. मुळा लागवडीचे अंतर हे मुळ्याची जात, त्याची वाढ आणि हंगामावर अवलंबून असते. तथापि, कमी अंतरावर लागवड केल्यास मध्यम आकाराचे मुळे मिळून उत्पादन जास्त मिळते.
- मुळ्याच्या एक हेक्टर लागवडीसाठी १० ते १२ किलो बियाणे लागते.
खत व्यवस्थापन
- मुळ्याचे पीक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे जास्त उत्पादन मिळण्यासाठी या पिकाला खते वेळेवर द्यावीत.
- जमिनीची मशागत करताना चांगले कुजलेले शेणखत २५ टन दर हेक्टरी जमिनीत मिसळून द्यावे.
- मुळ्याच्या पिकाला दर हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे.
- स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा पेरणीपूर्वी द्यावी.
- नत्राची उरलेली अर्धी मात्रा ही बी उगवून आल्यावर म्हणजेच पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी द्यावी.
- कोरड्या जमिनीत मुळ्याची पेरणी करू नये.
- बियांची पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे.
आंतरमशागत
- मुळ्याची अंतरमशागत कमी अंतरावर करतात. म्हणून जमिनीची मशागत चांगली करणे आवश्यक आहे.
- पीक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे सुरुवातीच्या काळात पिकात खुरप्याच्या सहायाने निंदणी वेळेवर करून पिक तणरहित करावे.
- साधारणपणे दोन निंदण्या कराव्यात. एक खोदणी आणि एक निंदणी सुरुवातीच्या काळात करावी.
- मुळे लांब वाढणार्या जातींना आवश्यकतेप्रमाणे भर द्यावी.
काढणी
- मुळ्याची लागवड केल्यानंतर जातीनुसार ४० ते ४५ दिवसांनी मुळे काढणीसाठी तयार होतात.
- मुळे नाजूक आणि कोवळे असतानाच मुळ्यांची काढणी करावी.
- मुळा जास्त दिवस जमिनीत राहिल्यास कडसर, तिखट आणि जरड होतो.
- मुळ्याला गाभा रवाळ होऊन भेगा पडतात.
- मुळे काढण्यापूर्वी शेताला पाणी द्यावे आणि हाताने मुळे उपटून काढावेत. नंतर त्यावरील माती काढून मुळे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत.
- किडलेले, रोगट मुळे वेगळे काढावेत. मुळे पाल्यासह काढून विक्रीसाठी पाठवतात.
उत्पादन
- पाने आणि मुळे यांना इजा होऊ नये म्हणून टोपलीत किंवा खोक्यात व्यवस्थित रचून विक्रीसाठी पाठवावीत.
- मुळ्याचे उत्पादन हे मुळ्याची जात आणि लागवडीचा हंगाम यावर अवलंबून असते.
- साधारणपणे रब्बी हंगामात मुळ्याचे दर हेेक्टरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळते.
- या मुळ्याला बाजारात चांगली मागणी असते.
- या पिकाचे शेतकर्याला अधिक उत्पन्न घेता येऊ शकते.