पीकपोषणासाठी कॅल्शिअम आहे अत्यंत महत्वाचे
पिकांच्या उत्तम वाढीसाठी, उत्पादनासाठी नत्र , पालाश , स्फुरद, कॅल्शिअम अन्नद्रव्ये आवश्यक असतात.पीकपोषणात कॅल्शिअमचे महत्वाचे दुय्यम स्थान आहे.नत्रयुक्त खतांची कार्य क्षमता वाढवण्यासाठी कॅल्शिअम मदत करते. त्यामुळे खतांद्वारे कॅल्शिअम देणे आवश्यक ठरते.कॅल्शिअम भौतिक व रासायनिक गुणधर्म उत्तम ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे जमिनीची पाणी निचरा होण्याची क्षमता चांगली राहते. जमिनीचा सामू जर ७ ते ८.५ असेल तर त्या जमिनीत कॅल्शिअमची उपलब्धता जास्त प्रमाणात असते. जमिनीचा सामू ६ पेक्षा कमी असेल तर कॅल्शिअमचे प्रमाण कमी असते. चोपण जमिनीत सोडियमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे कॅल्शिअमचे प्रमाण कमी असते. अश्या वेळेस खताद्वारे कॅल्शिअम द्यावे लागते.
कॅल्शिअमचे महत्व –
१. पिकांची फुल व फळधारणा क्षमता वाढवण्यास कॅल्शिअम मदत करते.
२. कॅल्शिअममुळे पेशी भित्तिका मजबूत होतात.
३. पिकाची प्रत उत्तम राहून उत्पादनात वाढ होते.
४. कॅल्शिअम पिकांमध्ये उष्माघातक विरोधी प्रथिने तयार करतात.त्यामुळे उष्णतेपासून पिकाचे संरक्षण होते.
५. पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
६. अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या प्रथिनांना कॅल्शिअम मदत करते.
७. भूधारकांमध्ये कॅल्शिअम चा वापर होतो.
८. जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.
९. कॅल्शिअममुळे मुळांची , पिकांची वाढ लवकर होते.
१०. शर्कराचे वहन चांगले होते.
११. कॅल्शिअम लोह , नत्र , तांबे , जस्ताचे पिकांमध्ये शोषण वाढवते.
कॅल्शिअम कमी असल्याची लक्षणे –
१. पिकांच्या कळ्या , शेंडे , मुळांची वाढ खुंटते.
२. पिकांच्या शेंड्यावर लवकरच लक्षणे दिसून येतात.
३. बीजोत्पादनाचा घट होते.
४. पिकांची वाढ कमी होते.
५. पिकांच्या पानांचा कडा करपतो.
६. पानांवर पिवळे डाग पडून टोके जळतात .
७. फुलांची गळती होते.
जमिनीतील कॅल्शिअम योग्य राखण्यासाठी काय करावे-
१. नायट्रेट नत्र असलेल्या खतांबरोबर कॅल्शिअमयुक्त खतांचा वापर करावा.
२. हलक्या ते रेताड जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर करावा.
३. आम्लधर्मी चुना , चोपण जमिनीत जिप्समचा उपयोग करावा.
कॅल्शिअम पिकासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तुम्ही फवारणीद्वारे देखील पिकाला देता येते. कॅल्शिअम मुळे पिकांची उत्तम वाढ होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.