पावसाळ्यात असे सांभाळा जनावरांचे आरोग्य … …”
बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊसामुळे जनावरांना विविध प्रकारचे आजार उद्भवतात. ज्यामध्ये फऱ्या, घटसर्प, लाळ्या खुरकूत गोचीड तापासारखे आजार होतात. ज्यातील काही आजारांमध्ये जनावरे तडकाफडकी मरतात तर काहींमध्ये तीव्र ताप पण उद्भवतो.
जनावरे ही शेतकऱ्यांच्या जीवनातील एक मुख्य घटक असल्याने त्यांची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही, तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू शकतो. पावसाळ्यात ओलसर जमिनीशी जास्त संपर्क होत असल्याने पावसाळ्यात जनावरांना कासेचे आजार जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे त्याच्यावर उपाय म्हणजे कासेची स्वच्छता व्यवस्थित राखावी. जनावरांचे दूध काढून झाल्यानंतर दिवसातून किमान दोन वेळा जनावरांचे सर्व सड जंतुनाशकांमध्ये मध्ये बुडवून धरल्यास निर्जंतुकीकरण होतो. पावसाळ्यामध्ये जागोजागी पाणी साचते आणि हे पाणी कचरा, माती, धूळ यांसारख्या गोष्टींमुळे दूषित होऊन जाते. हे पाणी जनावरांच्या पिण्यात आल्याने त्यांच्यामध्ये रोगराईचा प्रादुर्भाव वाढतो. या गोष्टी टाळण्यासाठी जनावरांना पिण्यासाठी विहिरीचे किंवा इतर चांगले पाणी द्यावे.
जनावरांच्या ठिकाणची जमीन शक्यतो सपाट असावी. आजूबाजूला खड्डे असल्यास ते वेळोवेळी बुजवून टाकावे. यामुळे जनावरांना कासदाह होण्याची शक्यता कमी करता येते.
जनावरांना पावसाळ्यात होणारे काही मुख्य आजार :-
• कासदाह- या रोगामध्ये जनावरांच्या सडाला आणि कासेला सूज येते. त्यांच्यापासून मिळणारे दूध हे रक्त व पू मिश्रित येते आणि अतिशय पातळ दूध मिळते. दूध काढण्यापूर्वी कास नियमितपणे जंतुनाशकाने स्वच्छ धुवावी.अधून-मधून कासदाह रोगाच्या दक्षतेसाठी दुधाची तपासणी करून घ्यावी.
• घटसर्प- या रोगात जनावरे अचानक आजारी पडतात. अंगात ताप भरतो आणि खाणे पिणे हळू हळू बंद होऊ लागते, गळ्यावर सूज येते आणि घशाची घरघर सुरू होते. या रोगापासून वाचण्यासाठी दरवर्षी पावसाळा सुरु होण्याआधी निरोगी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.
• फऱ्या – या रोगामध्ये अचानक ताप चढतो, मागील पाय लंगडू लागतो, अंगावर काही ठिकाणी व गळ्याजवळील भागावर सूज दिसू लागते. सुज दाबल्यास चरचर आवाज येतो. यापासून बचावासाठी फऱ्या रोगासाठी जनावरांना दरवर्षी लसीकरण करून घ्यावे.
• तिवा – या रोगामध्ये जनावरांना येणाऱ्या तापाची तीव्रता भयंकर असते. जनावरांचे खाणे-पिणे मंदावते आणि अंगाचा थरकाप सुरु होतो. या रोगापासून वाचण्यासाठी जनावरांच्या परिसरात होणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव थांबवण्याकडे लक्ष द्यावे.
• पोटफुगी- या रोगात जनावरांची डावी कूस फुगलेली दिसते. इतर रोगांप्रमाणेच या मध्येदेखील जनावरांचे खाणे-पिणे बंद होऊ लागते. जनावरे अस्वस्थ होऊन जातात, त्यांच्या जीवाची तगमग चालू असते. या रोगापासून वाचण्यासाठी पावसाळ्यात ओला व कोवळा चारा मोजक्याच प्रमाणात द्यावा. त्याचे प्रमाण अति झाले तर ह्या आजाराची शक्यता वाढते.
• हगवण – या प्रकारात जनावरास वारंवार रक्तमिश्रित साधे किंवा पातळ दुर्गंधीयुक्त शौचास होते. जनावरे गळून जातात- मलूल होतात. अशुद्ध व घाणेरडा चारा खाण्यात आल्यामुळे हा आजार उद्भवतो हे टाळण्यासाठी जनावरांना शुद्ध पाणी व चांगले खाद्य द्यावे.
पावसाळ्यात झपाट्याने वाढणारा कोवळा चारा जास्त प्रमाणात खाल्याने जनावरांमध्ये अपचन, हगवण, पोटफुगी यांसारखे आजार उद्भवतात. अशा परिस्थितीत कोरडा चाऱ्यासोबत मोजक्याच प्रमाणात ओला व कोवळा चार जनावरांना खाण्यास द्यावा. शेतकऱ्यांच्या रोजच्याच जीवनातील महत्वाचा घटक म्हणजे जनावरे. या पावसाळी वातावरणात जनावरांची काळजी अतिशय चांगल्या प्रकारे जर आपण घेतली तरच त्यांचे आरोग्य सुदृढ राहू शकेल. त्यासाठी सतर्कता अतिशय महत्वाची.व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क