पालक लागवडीची योग्य पद्धत
पालेभाज्यांमधून पालक ही लोकप्रिय भाजी आहे. पालकापासून भाजी , सूप ,आमटी, भजे असे अनेक विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. पालकांमध्ये अनेक पोषणमूल्य असतात. या भाजीत अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात तर प्रोटिन्स , कॅल्शिअम , लोह , खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.पालक हे पीक वर्षभर घेता येते. जाणून घेऊयात पालक लागवड पद्धत .
हवामान व जमीन –
१. थंड हवामानात पालकाचे पीक चांगले येते.
२. पालक हे हिवाळी पीक असल्याने कडक उन्हात हे पीक घेणे टाळावेत.
३. पालकाची लागवड विविध जमिनीमध्ये करता येते.
४. खारवट जमिनीत देखील या पिकाची लागवड करता येते.
सुधारित जाती –
भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे पालकाच्या खालील जाती विकसित करण्यात आल्या आहेत.
१. पालक ऑल ग्रीन पुसा ज्योती
२. पुसा हरित
लागवड –
१. खरीप हंगामातील लागवड जून , जुलै महिन्यात केली जाते.
२. रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर , ओक्टोम्बर महिन्यात केली जाते.
३. १० ते १५ दिवसांच्या अंतराने बियांची पेरणी करावी जेणेकरून भाजीचे उत्पादन सतत मिळत राहील.
४. जमिनीवर सपाट वाफे तयार करून बिया फेकून त्यांची पेरणी करावी.
५. बीया मातीत मिसळून त्यास हलके पाणी द्यावे.
६. पेरणी करतांना दोन ओळीतील अंतर २० ते ३० सेंटिमीटर ठेवावेत.
७.पालकाच्या प्रति हेक्टर लागवडीसाठी २० ते २५ किलो बियाणे लागते.
कीड रोग आणि त्यांचे नियंत्रण –
१. पालक पिकावरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्याचा उत्तम निचरा करावा , पेरणीपूर्वी थायरम या नाशकाची बियाणांवर प्रक्रिया करावी.
२. हवेतील आद्रता वाढली की पानांवर गोल , मोठे करड्या रंगाचे डाग पडतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशक कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा ब्लॉकटॉक्स २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून त्या मिश्रणाची फवारणी करावी.
३. केवडा आणि तांबेरा रोगासाठी शेतातील ओलावा नियंत्रित ठेवावा.
४. मावा , भुंगरे या किडीच्या नियंत्रणासाठी ८ ते १० दिवसांच्या अंतराने १५ मिली एंडोसल्फोन १० लिटर पाण्यात मिसळून फवारावेत. काढणीच्या ८ ते १० दिवसाआधी फवारणी करणे टाळावेत.
काढणी आणि उत्पादन –
१. पालक पीक पेरणीनांतर १ महिन्यातच कापणीस तयार होते.
२. पालकाची पाने १५ ते ३० सेंटीमीटर पर्यंत वाढली तर पानांच्या देठाचा ५ ते ७.५ सेंटीमीटर भाग ठेवून त्याची कापणी करावी.
३. कापणी करतांना खराब रोपे काढून टाकावीत.
४. कापलेल्या पालकांच्या जुड्या व्यवस्थित रचून पोत्यात किंवा बांबूच्या टोपलीत रचून ठेवावेत.
५. पिकाचे उत्पादन पेरणीची वेळ , हवामान , कापणी यावर अवलंबून असते.
६. साधारणपणे पालक पिकाचे प्रति हेक्टरी १० ते १५ टन पर्यंत उत्पादन मिळते.
७. बियाणांचे उत्पादन १.५ टन पर्यंत मिळते.
तुम्ही जर पालक पिकाची योग्य पद्धतीने लागवड केली तर त्यातून उत्पादन जास्त होईल. पालक पिकाला बाराहीमहीने बाजारात मागणी असते.