कांदाचा वांदा, दरात सतत घसरण !
रोजच्या जेवणात आवर्जून खाल्ला जाणारा कांदा भावात सातत्याने घसरण होतांना दिसून येत आहे. चक्क गेल्या ७ दिवसात १ हजार रुपयांनी कांद्याचा दर घसरला आहे. येत्या १-२ आठवड्यात लाल कांद्याच्या आवकात वाढ होण्याची शक्यता आहे. जर आवक वाढली तर कांद्याच्या दरात अधिक घसरण होण्याची मोठी शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दक्षिणेकडील राज्याच्या कांद्याचा महाराष्ट्रातील कांद्यावर काय प्रभाव पडला ?
दक्षिणेकडील तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यांमधून कांदा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येत आहे. भारतभर महाराष्ट्रातील कांद्याची प्रत सर्वोत्तम समजली जाते. भारतात महाराष्ट्रात जास्त प्रमाणात कांदा लागवड होते त्याचबरोबर मध्यप्रदेश, गुजरात,कर्नाटक, राजस्थान येथे देखील कांदा लागवड भरपूर प्रमाणात केली जाते. दक्षिण भागात तामिळनाडू, आंध्रप्रदेश , कर्नाटक येथे जास्त प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. तेथील बाजारपेठेत जास्त संख्येने कांदा विक्रीस आला आहे. दररोज बाजारात कांदा विक्रीनंतर देखील अधिक संख्येने कांदा बाकी राहतो. त्यामुळे कांदयाच्या दरात घसरण होत आहे. भविष्यात कांद्याचे अधिक उत्पादन मिळणार आहे त्यामुळे कांदा दरात अजून घट होण्याची शक्यता आहे.
लाल कांदा साठवणूक का केली जात नाही ?
उन्हाळी कांद्यांची काढणी केल्यानंतर त्यांची साठवणूक करता येते मात्र लाल कांद्याच्या बाबतीत असे नाही करता येत. लाल कांद्याची साठवणूक करता येत नाही त्यामुळे काढणी केलेला संपूर्ण कांदा बाजारात विक्रीस न्यावा लागतो. नवीन कांद्याची काढणी आता सुरु झाली आहे . त्यामुळे कांदा उत्पादनात वाढ होईल. याचा मोठा फटका कांदा उत्पादकास बसणार आहे.