मसाला पिकाची राणी इलायची लागवड पद्धत
मसाला पिकाची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलायचीचे पीक कोकणात मुख्य पीक म्हणून घेतले जाते. या पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी सुधारित पद्धतीने या पिकाची लागवड करणे गरजेचे आहे. इलायची लागवड पद्धत आपण आज जाणून घेणार आहोत.
जमीन व हवामान-
१. भरपूर पाणी पुरवठा होईल अश्या सकस जमिनीत इलायचीचे पीक उत्तम होते.
२. मुळाशी पाणी साठून राहिल्यास पिकाची हानी होते त्यामुळे या पिकासाठी शक्यतो रेताड जमीन निवडावीत.
३. किमान १० अंश से.ग्रे तर कमाल तापमान ३५ अंश से.ग्रे असलेल्या भागात हे पीक उत्तम येते.
४. समप्रमाणात पडणारा पाऊस या पिकास उपयुक्त ठरतो.
५. पावसाळ्यानंतर या पिकास नियमितपणे पाणी देणे गरजेचे ठरते.
६. उष्ण हवामानात ही पिके करपतात. त्यामुळे उष्ण हवामानात या पिकाचे आंतरपीक घ्यावे.
पूर्वमशागत –
१. इलायची पिकास सावलीची गरज असते. त्यामुळे नारळ , सुपारीच्या बागेत या पिकाची लागवड करणे फायद्याचे ठरते.
२. सूर्यप्रकाश सरळ या पिकांवर पडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
३. सुपारीचे लागवड अंतर ३ x ३ मीटर असेल तर २ झाडांमध्ये १ इलायचीचे रोप लावता येते.
४. २ x २ x १ फूट मापाचे खड्डे खोदून त्यात चांगले कुजलेले शेणखत टाकून त्यात रोपे लावावीत.
लागवड –
१. खत व माती खड्यात भरून जमिनीच्या पातळीपेक्षा ३ ते ४ इंच उंचवटा तयार करावा.
२. रोपांना पाणी दिल्यानंतर लगेचच त्याची लागवड न करता काही तासानी त्याची लागवड करावी.
३. रोपे जास्त खोल लावू नयेत. रोपे खोल लावल्यास ते कमजोर होऊन मरण्याची शक्यता असते.
४. रोपे लावण्यापूर्वी त्यांची वाढ २.५ ते ३ फूट आहे का तर एका रोपास १ ते ३ फुटवे आहेत कि नाही तपासून घ्यावे.
५. या पिकास जमीन व हवामान मानवल्यास लवकरच या पिकास फळे येण्यास सुरुवात होते.
पाणी व्यवस्थापन –
१. पावसाळा संपला की लगेचच या पिकास पाणी देण्याची व्यवस्था करावी.
२. जमिनीत नियमित ओलावा राहील याची काळजी घ्यावी.
३. या पीक भोवती आळे न तयार करता मोकाट पाणी द्यावे.
काढणी-
१. या फळांचा हिरवा रंग जाऊन पिवळा रंग येण्यास सुरुवात झाल्यास या फळाची काढणी करावी.
२. ही फळे अलगद देठासोबत कापून घ्यावीत.
३. ही फळे ४ ते ५ दिवस चांगल्याप्रकारे वाळवून घ्यावीत.
४. फळे वाळवण्यासाठी सूर्यप्रकाश नसेल तर कोळश्याची शेगडी पेटवून त्यापासून दीड फूट अंतरावर तारेची जाळी पसरवून त्यावर ही फळे वाळवावित.
५. तडकलेली व खराब झालेली फळे त्वरित वेगळी करावीत.
६. ही फळे घट्ट झाकण असलेल्या पत्राच्या डब्यात साठवून ठेवावीत.
उत्पादन –
साधारणतः एका झाडापासून सरासरी २०० ग्रॅम पर्यंत वाढलेली फळे मिळतात.
इलायची पिकाची बाजारात मोठ्या संख्येने मागणी असते. पदार्थास चव , सुवास येण्यासाठी याचा वापर केला जातो. योग्यप्रकारे व्यवस्थापन करून या पिकाची लागवड केल्यास या पिकापासून अधिक उत्पादन मिळते.