महिलांसाठी फायदेशीर डाळ प्रक्रिया उद्योग !
शेतकरी जास्त नफा मिळवून देणाऱ्या उद्योगाच्या शोधात असतात. त्यात अनेक महिलांना आपण कोणता उद्योग करावा ? कोणता उद्योग करणे फायद्याचे राहील ? असे प्रश्न पडतात. असा एक उद्योग आहे जो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांबरोबर महिलांसाठी देखील फायदेशीर ठरतो. तो उद्योग म्हणजे डाळ प्रक्रिया उद्योग. ज्या ठिकाणी कडधान्याचे पीक घेतले जाते अश्या ठिकाणीच कडधान्यावर प्रक्रिया केल्यास वाहतुकीचा खर्च तर वाचतोच त्याच बरोबर रोजगाराची मोठी संधी देखील उपलब्ध होते. अश्या उद्योगासाठी शासनाकडून काही योजना देखील राबविल्या जातात. आपण आज डाळ प्रक्रिया उद्योगाची माहिती जाणून घेणार आहोत.
डाळ प्रक्रिया उद्योग –
१. तुरीपासून डाळ तयार करण्यासाठी तुरीवर प्रक्रिया करावी लागते. डाळ भरडून त्याची टरफले काढून डाळ वेगळी करावी लागते.
२. तूर डाळीचे उत्पादन ३ प्रतीत होते. त्यामध्ये फटका, सव्वा नंबर आणि सर्वसाधारण अश्या ३ ग्रेडचा समावेश होतो.
३. डाळ तयार करतांना तयार होणारा भुसा चुरी देखील वाया जात नाही.
४. तुरीची डाळ तयार करण्यापूर्वी तुरीस ६ ते ८ तास भिजवल्यानंतर ३ ते ४ दिवस त्यास वाळवून घ्यावे लागते.
५. जर डाळ मिल मोठी असेल तर तिथे तेलाच्या साहाय्याने तूर डाळ उन्हात वाळवली जाते. त्यानंतर रोलर मध्ये भरडून त्याची डाळ तयार केली जाते.
६. डाळ तयार करण्यासाठी मिनी डाळ मिलचा वापर करता येतो. ही मिल २ अश्व शक्तीच्या विद्युत मोटारीवर देखील चालते.
७. यामध्ये कच्चामाल पुरवण्यासाठी मजुरांची गरज भासत नाही.
८. या मिलच्या साहायाने टरफले काढणे सोपे जाते.
९. रोलर मधून दाणे बाहेर पडण्यासाठी विशिष्ट यंत्रणा त्यात बसवलेली आहे.
डाळ मिल उभी करतांना जागेची निवड कशी करावी? –
१. ज्या ठिकाणी कच्चा माल , पक्का माल सहज उपलब्ध होईल अशी जागा निवडावी.
२. काही गाव मिळून मिलची उभारणी करू शकतात.
३. या मिल साठी ५० चौरस मीटर ची एक खोली तसेच २०० चौरस मीटरची जागा असावी लागते.
४. धान्य वाळवण्यासाठी ओटा असणे आवश्यक आहे.
५. मिलसाठी ५ किलो वॅटचा विद्युत पुरवठा असणे गरजेचे आहे.
असा हा लघु डाळ प्रक्रिया उद्योग गावात कमी जागेतही फायदेशीरपणे उभारता येतो. हा उद्योग अगदी महिला देखील करू शकतात.