कुकुटपालन करून साधा आपला आर्थिक विकास…!
राज्यातील आदिवासी बांधवांच्या आर्थिक विकासासाठी आणि त्यांच्या उत्पन्नांच्या प्रकारांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. केवळ शेतीवर अवलंबून न राहता काही जोडधंद्यांचा आधार मिळाला तर त्यांना स्वतःचा विकास करणे सोपे जाईल. या जोडधंद्यांमध्ये कुक्कुटपालन हा सहज करता येण्यासारखा उद्योग आहे.
नाशिक, राजूर, कळवण, नंदुरबार, तळोदा, धुळे, शहापूर आणि पेण या कार्यक्षेत्रातील आदिवासींच्या स्वयंसहायता बचत गटांसाठी राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक कुक्कुटपालन योजनेच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने ही योजना राबविण्यात येणार आहे.
कोणाला आणि कसा मिळणार लाभ ?
१) इच्छुक बचत गटातील सर्व सदस्य हे अनुसूचित जमातीचे असावेत.
२) बचत गटाच्या बँक खात्यातील व्यवहार चालू असावा.
३) बचत गटातील सर्व सदस्यांचे रजिस्टर हमीपत्र आणि शासन निर्णयात नमूद असणारी सर्व आवश्यक कागदपत्रे ह्या गोष्टी पूर्ण असाव्यात.
४) या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या बचत गटांना शेडच्या बांधकामासाठी अर्थसहाय्य, छोटे छोटे पक्षी, पशु खाद्य आणि इतर आवश्यक साहित्य पुरवले जाणार आहे.
५) पात्र ठरलेल्या लाभार्थी बचतगटाला ५.२५ लाख अनुदान शासनाकडून मिळणार आहे.
६) कुक्कुटपालन व्यवस्थापनासाठी तसेच पक्ष्यांच्या लसीकरण आणि संगोपनासाठी आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे.
७) कुक्कुटपालन क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांसोबत करार करून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
शेतीसोबतच या जोडधंद्याच्या मदतीने लाभार्थ्यांना आर्थिक विकास साधता येईल. राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून मिळणाऱ्या या एकात्मिक कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक बचत गटांनी विभागाच्या संबंधित प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा.
ब्युरो रिपोर्ट – किसनराज डेस्क