पैसा आता उड्या मारत आपल्याकडे येईल…

Shares

शेतीला पूरक जोडधंदा म्हणून पशूपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, मधुमक्षिका पालन असे उद्योग केले जातात. पण आता अगदीच कमी गुंतवणुकीमध्ये आणि कमी जागेमध्ये फायदेशीर व्यवसाय म्हणून ससे पालनाकडे पाहिले जाते. ससे पालनाचे स्वरूप एवढे मोठे होत आहे की, बऱ्याच ठिकाणी ससे पालन संस्था आणि सशांसाठी फार्म उभारण्यात आले आहेत. नव्या उद्योजकांना माहिती मिळण्यासाठी अशा बऱ्याच संस्था ससे पालनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देतात आणि यासोबतच ससे पालन व्यवसायासाठी लागणारे सामान आणि ससेसुद्धा पुरवतात.
व्यवसायाचे महत्त्व :-
बाजारपेठांमध्ये मांसाची मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी होतो आहे. त्यामुळे आपल्या देशातील मांस उत्पादन आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे. बाजारपेठेत मांस कमी पडते आहे आणि पुरवठा करण्यासाठी कमी वेळेत जास्त मांस उत्पादन करणे आवश्यक आहे. यासाठी लवकर लवकर उत्पादन होणार ससा हा प्राणी फायदेशीर ठरतो.सशांच्या दोन पिढीमधले अंतर ७-८ महिने असते आणि एका वेळेला सशांची मादी ५-१० किंवा त्यापेक्षा जास्त पिल्ले देते. जास्त उत्पादनासोबतच वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे सशांच्या मांसाला एक विशिष्ट प्रकारची चव असल्यामुळे त्याला भरपूर मागणी आहे.
सशाच्या विविध प्रजाती आणि राहण्याची व्यवस्था
ससा या गोजिरवाण्या प्राण्याचे उत्पादन करणे आता सगळीकडेच सुरु झाले आहे. न्युझीलँड व्हाईट, न्युझीलँड ब्लॅक, ग्रे व्हाइट, मिनी लोप, मिनी रेक्स, रशियन चिंचेला अशा बऱ्याच जातींचे ससे बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. ससे पालनासाठी लोखंडी पिंजरे योग्य ठरतात, त्याचे कारण म्हणजे सशांना पिंजऱ्यात खाद्यान्न चांगल्या प्रकारे देता येते आणि सशांची होणारी वाढ बारकाईने तपासता येते. पिंजऱ्यामुळे त्यांना होणारे आजार लवकर लक्षात येतात.
कसा असावे आर्थिक गणित :-
सशांच्या एका युनिटमध्ये ४ नर आणि ६ माद्या, आवश्यक आकाराचे पिंजरे, खाद्यासाठी कटोर्‍या आणि उपचारासाठी महत्त्वाची औषधे यांचा समावेश होतो. हे युनिट आपल्याला ससे पालन केंद्रातून विकत घेता येते. साधारणपणे एका युनिट पासून 160 ते 180 पिल्ली मिळतात, त्यातून सशांचा मृत्यूचा दर सुमारे 25 ते 30 टक्के एवढा असतो. त्यामुळे साधारणपणे 110 ते 120 पिल्ली विक्रीसाठी उपलब्ध होतात. प्रौढ झालेले ससे योग्य वेळेत कळपातून काढावी लागतात. सशांच्या वयाच्या तीन ते चार महिन्यांपासून त्यांची मांसासाठी विक्री करता येते. मेलेल्या सशांच्या चामड्यापासून आणि खतापासून सुद्धा चांगले उत्पन्न मिळते. व्यवसाय सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था ससेपालन प्रशिक्षण देतात. प्रशिक्षण घेऊन नंतर जर व्यवसाय सुरू केला यातील बारीक सारीक गोष्टी लवकर लक्षात येतात.
खाद्य कसे असावे ? :-
ससा हा शाकाहारी प्राणी आहे, त्याच्या आहारात मुख्यत: गवताचा समावेश करावा लागतो. पालक, कोबी अशा पालेभाज्या. गव्हाचा कोंडा, स्वयंपाक घरातील उरलेले अन्न व भाजीपाल्याचा भाग हा आपण देऊ शकतो. सशांना प्रथिनांचा पुरवठा होण्यासाठी सोयाबीन उपयुक्त ठरते. दिवसभर स्वच्छ आणि मुबलक पाणी पिंजऱ्यात ठेवावे. सशांना मुळा, कांदा, बटाटा, शेंगदाणे या गोष्टी देणे टाळावे.
या सर्वच गोष्टी लक्षात घेऊन “ससे पालन” हा व्यवसाय अगदीच कमी गुंतवणुकीतून, कमी वेळामध्ये, कमी जागेत मुबलक उत्पन्न देतो. अगदीच सोपा असणारा हा व्यवसाय गृहिणी, महिला बचत गट यांनासुद्धा सहज शक्य आहे. खात्रीशीरपणे फायदा मिळवून देणाऱ्या आणि विक्रीची हमी असणाऱ्या या व्यवसायाची जोडधंदा म्हणून निवड केली तर फायदा हा शंभर टक्के होणारच.
व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *