केळीवरील या रोगावर नियंत्रण मिळवून वाचवा लाखों रुपये !
अनेक शेतकरी फळपिकांमध्ये केळी पिकाची लागवड करतात. केळी लागवड करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवता येतो. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात केळी पिकाची लागवड मोठ्या संख्येने केली जाते. जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी सगळीकडे ओळखला जातो. येथील केळीला जीआय टॅग दिला गेला आहे. केळी पिकातून जास्त नफा मिळवण्यासाठी त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. या पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव लवकर व जास्त प्रमाणात होतो. केळी पिकावरील रोगाचे लक्षणे वेळीच ओळखून त्याचे निवारण करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. आज आपण केळी पिकावरील ब्लॅक सिगाटोका या भयंकर रोगाचे लक्षणे व त्यावर कसे नियंत्रण करावे याची माहिती जाणून घेणार आहोत.
ब्लॅक सिगाटोका-
१. हा केळी पिकांवर घातक ठरणारा रोग आहे. हा रोग जगभरच्या केळी पिकावर आढळतो.
२. या रोगावर नियंत्रण आणले नाही तर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
३. हा रोग केळीच्या पानांवर याचे वर्चस्व गाजवतो.
४. हा रोग लवकर पसरतो त्यामुळे वेळीच या रोगाचे लक्षणे ओळखून त्यावर नियंत्रण केले पाहिजे.
लक्षणे-
१. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांवर लाल , तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात.
२. केळीच्या पानाच्या खालच्या बाजूस देखील असे ठिपके दिसून येतात.
३. हे ठिपके हळूहळू लांब , रुंद काळे पट्ट्यासारखे बनतात.
४. कालांतराने पानांची गळती होण्यास सुरुवात होते.
उपाययोजना-
१. हा रोग केळीच्या काही पानांवर आढळून आल्यास त्वरित केळीची रोगग्रस्त पाने कापून घ्यावीत.
२. ही रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत.
३. पिकांवर पेट्रोलियम आधारित खनिज तेलामध्ये १ % बुरशीनाशक टाकून फवारणी करावी.
४. यामध्ये प्रोपिकोनाझोल, कार्बेन्डाझिम यांसारख्या बुरशीनाशकाचा वापर करता येतो.
५. एका महिन्यातून ७ वेळा फवारणी केल्यास या रोगावर नियंत्रण मिळवता येते.
कोणत्याही प्रकारची फवारणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.