अवघ्या 35 दिवसात उत्पन्न देणारे काकडीचे पीक..!
काकडी या पित्तशामक फळाची मागणी सर्वत्र असल्याने याची लागवड देशभरात केली जाते. विशेषतः उष्ण व कोरड्या हवामानात वाढणारे हे पीक दमट आणि पर्जन्यमान जास्त असणाऱ्या ठिकाणी देखील चांगले उत्पादन देताना दिसून येते.
विविध खाद्यपदार्थांसोबतच कोशिंबिरीचा नवनवीन प्रकारांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या काकडीला बाजारात मोठी मागणी आहे. राज्यात सुमारे ३५०० हेक्टर एवढ्या क्षेत्रावर काकडीची लागवड होते. साधारणपणे खरिपाच्या हंगामासाठी जून-जुलै आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी मधील कालावधी योग्य मानला जातो. पाण्याचा निचरा होणारी जमीन या लागवडीसाठी पूरक ठरते.काकडी लागवडीसाठी अशी हवी जमीन :-
१) काकडीचे पीक घेण्यासाठी जमिनीला तयार करताना शेतात उभी व आडवी नांगरणी करून घ्यावी व मातीची ढेकळे फोडून घ्यावीत.
२) मातीचा कस राखण्यासाठी चांगल्याप्रकारे कुजलेले शेणखत टाकून वखरणी करावी.
३) उन्हाळ्यातील हंगामात लागवडीसाठी 60 ते 75 सेमी अंतरावर स-या पाडून लागवड करावी.
४) खरीपातील हंगामात लागवडीसाठी दर 3 मीटर अंतरावर 60 सेमी रूंदीचे 30 सेमी खोलीचे चर खोदावे, त्यांच्या दोन्ही बाजूंना 90 सेमी अंतरावर ओळी 30 × 30 × 30 सेमी आकाराचे खडडे तयार करून त्यात 2 ते 4 किलो शेणखत मिसळावे. प्रत्येक आळयात 3 ते 4 बिया योग्य अंतरावर लावाव्यात.
५) पाणी मुबलक व योग्य प्रमाणात द्यावे.
६) लाल किडा, फुलकिडा यांपासूनच्या बचावासाठी इंडोसल्फानचा वापर करता येतो.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क