शेतकऱ्यांना अजून किती रडवणार कांदा, दरात मोठी घसरण
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी, अतिवृष्टी तर आता युद्ध यामुळे शेतमालाच्या दरामध्ये मोठी तफावत येत आहे. तरीही शेतकऱ्यांनी सर्व संकटांचा सामना केला. मात्र आता कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे.
या ८ दिवसांमध्ये लाल कांद्याच्या दरात ७६४ रुपयांची तर उन्हाळी लाल कांद्याच्या दरात ६३० रुपयांची घसरण झाली आहे. कांदाच्या दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादकांना ११ कोटी ७२ लाख रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कांद्याचे दर
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीसाठी कंटेनर उपलब्ध नाहीत तर कांद्याची निर्यात ही लवकर करावी लागते अन्यथा कांदा कंटेनर मध्येच खराब होतो. त्यामुळे सध्या केंद्र सरकारने शेतमाल निर्यातीवर निर्बंध लावले आहेत.
वेळेवर कांद्याची निर्यात न झाल्यास कांदा खराब होतो. त्यामुळे स्वतःच्या रिस्क वर कांद्याची निर्यात करावी लागणार आहे. त्यामुळे कांद्याचे घटते दर, निर्यातीवरील निर्बंध यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता काही संकटांचा सामना करावा लागणार आहे.
शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले
आधीच अवकाळीमुळे उत्पादनात मोठी घट झाली असून पिकांच्या लागवड आणि व्यवस्थापनासाठी अधिकचा खर्च लागला आहे. त्या खर्चाच्या तुलनेत अगदी कवडीमोलाचा दर मिळत आहे.
त्यात आता पेट्रोल , डिझेल , गॅस असे सर्वच गोष्टींच्या दरामध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे शेतकरी अधिक चिंतेत असल्याचे निदर्शनास येत आहे.