पिकपाणी

बहुगुणी हळदीची फायदेशीर शेती…!

Shares

हळद ही अत्यंत बहुगुणी आहे. हळदीचा उपयोग मसाले, औषध, रंगरंगोटी, सौंदर्यप्रसाधने आणि धार्मिक विधींमध्ये केला जातो. भारतामधून हळदीचे मोठ्या संख्येने निर्यात केली जाते.हळदीची लागवड व निर्यातीत भारत जगात प्रथम स्थानावर आहे. भारतात आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि केरळपाठोपाठ महाराष्ट्रात हे पीक घेतले जाते.हळदीची लागवड सहजतेने केली जाऊ शकते आणि कमी किंमतीचे तंत्रज्ञान स्विकारून देखील हळदीचे उत्पन्न चांगले घेऊ शकतो.

जमीन आणि हवामान –
१. सिलिकायुक्त चिकणमाती किंवा चिकणमातीत हळदीची लागवड यशस्वीरित्या केली जाते.
२. शेतात ड्रेनेजची योग्य व्यवस्था असावी.
३. हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते.
४. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते.
५. पाण्याचा ताण व जास्त पाऊससमान हे पीक काही वेळ सहज सहन करू शकते.
६. परंतु जास्त दिवस पिकात पाणी साचून राहणे हानिकारक आहे.
७. तसेच कडक हिवाळा या पिकास मानवत नाही. सरासरी ५०० ते ७५० मिलीमीटर असणार्‍या निमशुष्क वातावरणात हळदीचे पीक चांगले येते.
८. थंडीमुळे हळदीची पानेवाढ काही अंशी थांबते व जमिनीतील कंदांची (फण्यांची) वाढ होते.
९. कोरडे व थंड हवामान कंद पोषणास अनुकूल असते.
१०. जर माती किंचित आम्लीय असेल तर त्यात
हळदीची लागवड यशस्वीरित्या करता येते.

प्रसिद्ध सुधारित वाण/ जाती –
१.फुले स्वरूप
२. सेलम
३. कृष्णा (कडाप्पा)
४. राजापुरी
५. खाण्याची हळद (Curcuma Longa )
६. कस्तुरी किंवा रानहळद ( Cucuma Caesia)
७. इस्ट इंडियन ॲरोरूट (East Indian Aroroot)
८. आंबेहळद (Curcuma Amada)
९. काळी हळद (Curcuma Caesia)
१०.कचोर (Curcuma Zedoria)

पूर्व मशागत –
१. हळद लागवडीमध्ये पूर्वमशागतीच्या कामामाध्ये नांगरट करणे, ढेकळे फोडणे, शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावाणे खणून ही सर्व कामे पूर्वनियोजन करून त्याप्रमाणे करून घेणे आवश्यक आहे.
२. त्यासाठी जमिनीची ट्रॅक्टर ने १८ ते २२ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी.
३. पहिल्या नंगारटीनंतर शेतात नंगारटीमधून चुकलेल्या कडा १ फुटांपर्यंत टिकावाने खणून घ्याव्यात.
४. त्याचवेळी जमिनीमधील कुंदा, लव्हाळ्याच्या गाठी यासारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत.
५. पहिल्या नंगारटीनंतर शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याचा कुळव मारून घ्यावा.
६. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी परत संपूर्ण ढेकळे फोडून घ्यावीत आणि ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.

लागवडीची वेळ
१. हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
२. ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार लागवडीचा कालावधी मागेपुढे होतो.

लागवडीची पद्धत –
सरी वरंबा पध्दत –
१. हळदीचे कंद जमिनीत वाढत असल्याने या पिकाची लागवड सरी वरंबा किंवा रुंद वरंबा पद्धतीने लागावड करावयाची झाल्यास ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सर्‍या पाडून घ्याव्यात.
२. शक्य असेल तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत टाकून द्यावे. ३. जमीनच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत.
४. वाकुर्‍याची लांबी जमिनीच्या उतारानुसार पाणी बसेल अशी ठेवावी.
५. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.

रुंद वरंबा पध्दत –
१. रुंद वरंबा पद्धतीने रान बांधणी करून काही ठिकाणी अधिक उत्पादन घेतले जाते.
२. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसून उत्पादनात २० ते २५ % वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
३. या पद्धतीने जमिनीस पाणी देण्यास जास्त त्रास होतो म्हणून अशा पद्धतीने लागण करावयाची असल्यास जमीन समपातळीत असणे आवश्यक आहे किंवा पाणी देण्याच्या सुधारित तंत्रज्ञानामधील ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे.
४. रुंद वरंबा तयार करताना १५० सें.मी. अंतरावर प्रथम सर्‍या पाडाव्यात.
५. त्या सर्‍या उजरून ८० ते ९० सें.मी. माथा असलेले १५ सें.मी. उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी व्यवस्थित बसेल अशा लांबी रूंदीचे सरी वरंबे पाडावेत.
६. वरंब्याचा माथा सपाट करून घ्यावा आणि मग लागवड करून घ्यावी.

बियाण्याचे प्रमाण –
हळद लागवडीसाठी एका हेक्टरसाठी २० ते २५ क्विंटल हळदीचे बियाणे आवश्यक आहेत.

बियाण्यावर उपचार –
कंद लागवड करण्यापूर्वी डायथेन एम -45 च्या 0.3% द्रावणासह त्याच्या कंदांवर चोळावे त्यामुळे रॉट रोग आढळत नाही.

खत व्यवस्थापन –
१. हळद पिकासाठी खतामधील सर्व घटकांची कमी- अधिक प्रमाणात गरज असते. मात्र हळद पिकासाठी रासायानिक खते वापरलेल्या हळदीच्या कंदावरती अनिष्ट परिणाम होतो. असा अनुभव शेतकर्‍यांचा आहे. तेव्हा हळदीला शक्य तेवढ्या प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा.
२. यामध्ये पुर्ण कुजलेले शेणखत एकरी १० टन (२० बैलगाड्या) आणि कल्पतरू सेंद्रिय खत ७५ ते १०० एकरी किलो दिन हप्त्यातून (लागवडीवेळी अर्धी मात्र आणि भरणीच्यावेळी अर्धी मात्रा याप्रमाणे) द्यावे.
३. त्याचवेळी हेक्टरी २०० ते ३०० किलो करंजी किंवा निंबोळी पेंड द्यावी आणि भरणी करून द्यावी. ४. या पिकास भरणीनंतर कोणतीही खते देऊ नयेत.

पाणी व्यवस्थापन –
१. हळदीची लागवड एप्रिल-मे महिन्यामध्ये होत असल्याने सुरुवातीच्या काळात पावसाची सुरुवात होईपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. कारण दरम्यानच्या काळात मुळांकडून स्थिरता प्राप्त होणे हा महत्त्वाचा कालावधी असतो.
२. लागवडीनंतर आंबवणीचे पाणी लगेच ४ ते ६ दिवसांच्या अंतराने द्यावे.
३. जमिनीच्या प्रतिनुसार हा कालावधी कमी -जास्त ठेवावा.
४. पावसाला सुरू झाल्यानंतर पावसाचेह पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
५. पावसाळ्यानंतर हिवाळयामध्ये पाण्याच्या २ पाळीमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे.
६. मात्र पीक काढणीच्या १५ दिवस अगोदर अजिबात पाणी देऊ नये.

काढणी –
१. हळद लागवडीमध्ये अतिशय महत्त्वाची आणि शेतकरी बंधूना खर्‍या अर्थाने क्लिष्ट वाटणारी बाब म्हणजे काढणी असते.
२. चांगल्या उत्पादन देणार्‍या हळद पिकाची काढणी ८.५ ते ९ महिन्यांनी करावी.
३. पक्क झालेल्या हळद पिकाच्या झाडाला पाला जमिनीच्या मगदूरानुसार पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ६० ते ८० टक्केच वाळला जातो.
४. अशावेळी झाडाचा पाल जमिनीलगत धारदार विळ्याने कापून घ्यावा.
५. त्यानंतर जमीन थोडीशी भेगाळून घ्यावी आणि कुदळीच्या सहाय्याने हळद काढणी करावी.
६. काढणी करताना जेठे गड्डे, हळकुंडे, सोर गड्डा अशी प्रतवारी करावी.
७. काढणीनंतर हळकुंडे तसेच बियाणे त्वरीत सावलीच्या ठिकाणी हलवावे.

अशाप्रकारे बहुगुणी असलेल्या हळदीचे उत्पादन करायला वरील घटकांची, सोयीस्कर हवामानाची गरज असते

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *