गुलाबावरील लाल कोळीचे नियंत्रण
आपल्या भारतामधून गुलाबाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते .काश्मिर, हिमाचलप्रदेश, गुजरात यासह महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, जळगाव, धुळे, नाशिक ह्या परिसरात निर्यात योग्य फुलांची लागवड करण्यास मोठी संधी आहे. या परिसरात हवामान, जमीन, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून येथे वाहतुकीची साधने ( रेल्वे, रस्ते ) उपलब्ध आहेत. परंतु गुलाबावर लाल कोळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जेव्हा हवेमध्ये आर्द्रता वाढते आणि उष्ण तापमान असते तेव्हा लाल कोळी किडीच्या प्रादुर्भाव देखील वाढतो.पॉलिहाउसमधील गुलाबाच्या झाडाची रचना, फांद्या, मोठी पाने यामुळे लाल कोळीचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढतो.
लक्षणे –
१. काही भागामध्ये काही झाडे मलूल पडल्यासारखी दिसतात.
२. जुनी पाने पिवळसर पडतात. नंतर पांढऱ्या रंगाची होतात.
३. साधारणपणे १५ ते २० दिवसांत पाने लाल तपकिरी रंगांची होऊन सुकतात आणि पाने गळण्यास सुरुवात होते.
४. पानांमध्ये जाळी तयार करून ही कीड रस शोषते.
५. कोळ्यासारखी जाळी दिसल्यास प्राथमिक अंदाज लावणे सोपे जाते.
६. लाल कोळी गुलाबाच्या पानांच्या खालच्या भागावर खातात.
७. विशेषत:जुन्या पानांमध्ये ते रंगहीन स्वरूपात आढळतात.
८. प्रथम ही कीड पानाच्या खाली आणि कालांतराने संख्या वाढल्याने पानांच्यावर तसेच फुलांमध्येही दिसायला सुरुवात होते.
९. पानांच्या पृष्ठभागावरील धुळीमुळे पानांचा श्वा्सोच्छ्वसावर अडथळा निर्माण होऊन त्याचा वेग मंदावतो. परिणामी, पानांचे देखील तापमान वाढते. त्यामुळे लाल कोळीची वाढ झपाट्याने होते.
जीवन चक्र –
१. उष्ण आणि दमट वातावरणामध्ये प्रौढ मादी १०० अंडी घालू शकते.
२. प्रत्येक अंडे अर्धपारदर्शक आणि मोत्यासारखे असतात.
३. या अंड्यामधून छोटी अळी बाहेर येते. अळीपासून प्रौढ असे संपूर्ण जीवन चक्र उष्ण वातावरणामध्ये सात दिवसांत पूर्ण होते.
४. पोषक वातावरणामध्ये लाल कोळी खूपच थोड्या कालावधीमध्ये प्रचंड संख्येने वाढतात.
५. उष्ण दमट वातावरण, पॉलिहाउसमध्ये खेळत्या हवेचा अभाव, गुलाबाच्या दोन ओळींमधील किंवा दोन झाडांतील दाटी, मुबलक आर्द्रता यामुळे देखील लाल कोळीचे प्रमाण वाढते.
नियंत्रण –
१. प्रौढ किडीबरोबर अंड्यांचा नाश गरजेचा आहे. २. फवारणी केल्यानंतर जिवंत अंडी पाच दिवसांत उबतात आणि त्याच्या अळ्या होतात.
३. अंड्यापासून अळ्या आणि नंतर ते प्रौढ होतात. हे प्रौढ पुढील पाच दिवसांनंतर पुन्हा अंडी घालू शकतात. त्यामुळे पाच दिवसांनी पुन्हा फवारणी करणे आवश्यक ठरते.
४. कोळी पानांच्या खालच्या बाजूला राहतात आणि तो भाग खातात. सुरुवातीला जमिनीलगत असतात जशी त्यांची संख्या वाढते तसे ते झाडाच्या वरच्या भागाकडे स्थलांतर करतात. त्यामुळे फवारणी पानांच्या खाली केल्याने परिणामकारक ठरते.
५. पॉलहाउसमधील तापमान नियंत्रण करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
६. त्यासाठी आतील हवा खेळती ठेवावी, स्वच्छ पाण्याचा स्प्रेयर किंवा पाइपने फवारणी करावी.
७. पूर्ण झाड ओले करून झाडांचे तापमान कमी करावे. शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी असे करावे.
८. नियंत्रणासाठी १० गुंठ्यांसाठी १० निळ्या चिकट सापळ्यांचा वापर प्रादुर्भाव मोजण्यासाठी फायदेशीर ठरतो.
९. नियंत्रण (प्रति लिटर पाणी ) निंबोळी आधारित कीटकनाशक ॲझाडीरेक्टीन (१००० पीपीएम) १ मिलि किंवा सल्फर (८० डब्ल्यूपी) २ ग्रॅम अबामेक्टिन (१.९ ईसी) ०.५ मिलि किंवा फेनाझाक्विन (१० ईसी) २.५ मिलि वापरावा.
टीप –
किडीमध्ये प्रतिकारशक्ती लवकर तयार होते. त्यामुळे कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.