या फुलाची शेती करा, वर्षाला मिळतील ७ लाख रुपये
भारत हा कृषिप्रधान देश असला तरी अनेकांना शेती व्यवसाय हा परवडणारा आहे असे वाटत नाही. मात्र तुम्ही योग्य पीक योग्य पद्धतीने घेतले तर नक्कीच तुम्ही शेती व्यवसायातून लाखो रुपये कमवू शकतात.
आपण आज अश्या पिकाची माहिती घेणार आहोत की या पिकाची लागवड करून तुम्ही वर्षाकाठी जवळजवळ ७ लाख रुपये कमवू शकता. ते पीक म्हणजे जरबेरा. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथील शेतकरी पंकज आडकिने हे जरबेराच्या दहा गुंठे फूल शेतीमधून वर्षाकाठी सात लाख रुपयांचे उत्पादन घेत आहेत.
या शेतकऱ्याने दहा गुंठे जमिनीवर पॉलिहाऊस तयार करून या पॉलिहाऊसमध्ये तीन तीन फुटाचे असे बेड तयार करण्यात आले. या बेडमध्ये लाल मातीचा वापर करण्यात आला आहे. या मातीवर अडकिने यांनी जरबेरा या फुलांच्या रोपट्यांची लागवड केली.
जरबेराची शेती करतांना लक्षात ठेवायच्या बाबी
जरबेरा फूल शेतीचे उत्पादन घेत असताना खूप कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. तसेच अत्यल्प मेहनत आणि अचूक वेळी फवारणी करावी लागते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये तापमान वाढले तर तापमान स्थिर ठेवण्यासाठी कूलर त्याचबरोबर पाण्याचा फवाराच्या माध्यमातून पॉलिहाऊसमधील तापमान स्थिर ठेवावे लागते.
खर्च आणि उत्पन्न
जरबेरा रोपांची लागवड करताना त्यांना दोन लाख रुपये इतका खर्च आला. त्यानंतर आजपर्यंत या फूल शेतीमधून दररोज फुलांचे उत्पादन घेतले जात आहे. या जरबेराच्या प्रत्येकी एका फुलाला दहा रुपये ते वीस रुपयांपर्यंत बाजार भाव मिळतो.
अडकिने दररोज ही फुलं नांदेड आणि हिंगोलीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात. त्यामधून त्यांना दररोज ३ ते ४ हजार रुपये मिळतात. तर लागवड खर्च वजा केला तर ५ लाख रुपये पर्यंत नफा मिळावा आहे.